बोरनदी धरणाजवळ तरुण-तरुणीला लुटणारी टोळी जेरबंद

सहा आरोपींना अटक, चौघे फरार

-आणखी गुन्हे उघडकीस येणार?
-नांदगाव पेठ पोलिसांची कामगिरी
नांदगाव पेठ/ 12 जुलै : गत 6 जून रोजी बोरनदी धरण परिसरात एक युवक व त्याची मैत्रिण फिरायला गेले असता त्यांना दहा जणांनी मारहाण करुन लुटले होते. युवकाजवळची रोकड आणि युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी या टोळीने जबरदस्तीने हिसकावून घेतली होती. या टोळीतील सहा आरोपींना जेरबंद करण्यात नांदगाव पेठ पोलिसांना यश आले आहे. 4 आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची शोध मोहिम सुरु आहे. या भागात जबरी चोरीच्या घटना घडत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यात याच टोळीचा हात असल्याची शक्यता आहे. अटक झालेल्या आरोपींच्या चोकशीतून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होउ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
6 जून रोजी घडलेल्या या घटनेची तक्रार सिव्हिल इंजिनिअर असलेल्या सिद्धांत सतीश राऊत (28, रा. फ्रेजरपुरा, अमरावती) या युवकाने नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसर सिद्धांत आपल्या मैत्रीणीसह बोरनदी धरण परिसरात फिरायला गेला होता. सायंकाळी 7 वाजता तेथून दोघेही घरी परत जाण्यासाठी निघाले असतानाच काही अंतरावर तीन दुचाकींवर आलेल्या दहा अनोळखी युवकांनी त्यांना अडवले. या युवकांनी सिद्धांत व त्याच्या मैत्रिणीशी गुडागर्दी करुन त्यांना मारहाण केली. सिद्धांतजवळ असलेले साडेचार हजार रुपये रोख आणि मैत्रीणीच्या गळ्यातील सुमारे 45 हजार रुपये किंमतीची सोन साखळी आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून घेत त्यांना लुटले.
सिद्धांत राऊत याने दिलेल्या तक्रारीवरून नांदगावपेठ पोलीसांनी दहा आरोपींवर गुन्ह्या नोंदविला. हे प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तातडीने या टोळीचा शोध सुरु केला. पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे तसेच डीबी पथकाने सुरुवातीला या टोळीतील सदस्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केला. त्यासाठी तांत्रिक बाबींची मदत घेण्यात आली. सोबतच आपली गुप्त यंत्रणाही पोलिसांनी कार्यान्वित केली. अखेर घटनेच्या एक महिन्यानंतर पोलिसांना या टोळीचा छडा लावण्यात यश प्राप्त झाले. या जबरी चोरी प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. या टोळीतील अन्य चार आरोपी फरार आहेत, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
बोर धरण परिसरात अशा जबरी चोरीच्या अनेक घटना घडल्या असून बरेच लोक या टोळीचे शिकार झाले असल्याची माहिती आहे. अशा घटनांमुळे धरण परिसरात फिरायला येणार्‍या प्रामुख्याने मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. काही तक्रारीही पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आरोपींच्या चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ठाणेदार दहातोंडे यांच्यासह उपनिरिक्षक वाणी, वाकडे, पोहेकाँ राजा राऊत, पोलिस कर्मचारी राजीक खान, निलेश साविकार, वैभव तिखीले, राजा सय्यद, संजय नेहारे, चालक वैभव धुरंदर यांनी ही कारवाई केली.
-गजाआड करण्यात आलेले आरोपी
या जबरी चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शारीक खान आबीद खान (22, रा. फातेमा नगर, लालखडी), शेख अयान शेख नसिर (20, रा. लालखडी), मोहम्मद शोएब उर्फ भल्ला मोहम्मद आरिफ (19), अयान खान आसिफ खान (19) आणि शेख शेरजील उर्फ राज शेख इरफान (19, रा. तिघेही यास्मीन नगर) यांच्यासह शहर व जिल्हा ग्रामीण मधून तडीपार असलेला कुख्यात शेख अरबाज शेख मुजीब (22, रा. लालखडी) याचा समावेश आहे. या गुन्ह्यातील अन्य चार फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button