जनसुरक्षा विधेयकाला शिवसेना, राष्ट्रवादीचा जोरदार विरोध

विधानसभेत शांत अन् विधानपरिषदेत राडा!

-चर्चेदरम्यान आमदार सभागृहाबाहेर पडले
-उद्धव ठाकरेंनी मांडली सविस्तर भूमिका
मुंबई / 11 जुलै: सरकारनं आणलेल्या जनसुरक्षा विधेयकावरुन विधानपरिषदेत आज चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या विधेयकाला जोरदार विरोध दर्शवला. सत्ताधार्‍यांच्या जे पोटात आहे तेच त्यांच्या ओठावर असल्याचं सांगत अंबादास दानवे यांनी सभागृह दणाणून सोडलं. शेवटी सभात्याग करुन आपला या विधेयकाला विरोध असल्याचं सांगत शिवसेनेचे सर्व आमदार बाहेर पडले. नंतर सभागृहाबाहेर उद्धव ठाकरे यांनी या विधेकावरील शिवसेनेचा का विरोध आहे? तसंच सभागृहात नेमकं काय घडलं? याबाबतची भूमिका सविस्तरपणे मांडली.
ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जनसुरक्षा कायदा हा काल खालच्या सभागृहात बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आलं. सत्ताधारी पक्षाकडं पाशवी बहुमत आहे. त्याचा ते उपयोग किंवा दुरुपयोग करत आहेत. आमचा या विधेयकला नेमका विरोध कशासाठी आहे? हे अनिल परब, सचिन अहिर या शिवसेनेच्या आमदारांनी तर अभिजीत पाटील या राष्ट्रवादीच्या आमदारानं विधानपरिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. सरकार सांगताना असं सांगत आहे की, नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे, दहशतवादाचा बिमोड करायचा आहे. पण या कायद्याच्या मसुद्यात कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख केलेला नाही. सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणीच्या संघटना असा उल्लेख केलेला आहे.
डावं आणि उजवं यामध्ये फरक करणं आपल्याला गरजेचं आहे. शिवसेना आणि भाजप आम्ही सर्वजण सोबत होतो तर आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे. आम्ही उजवे आहोत कारण आम्ही धर्म मानणारे आहोत. खरंतर म्हणजे डावं आणि उजवं करण्याची गरज नाही. पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत जे काही लिहिलेलं आहे. त्यामध्ये सर्वसमावेशकता आहे. यामध्ये समानता, सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. तसंच मोदींनी देखील सबका साथ, सबका विकास अशी घोषणा दिली आहे. म्हणजे ही डावी विचारसरणी आहे की उजवी हे यातून कळत नाही. आम्ही या विधेयकावर बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही.
आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत, राहू आणि राहणार याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही. पण राजकीय हेतून प्रेरित जर तुम्ही हे विधेयक आणत असाल तर त्याला आमचा विरोध आहे. म्हणजेच या कायद्यात कुठेही दहशतवाद किंवा नक्षलवाद असा उल्लेख नाही. म्हणजेच यामध्ये सरकार कोणालाही उचलून तुरुंगात टाकणार आहे. मला वाटतं काय कायद्याचं नाव जनसुरक्षा ऐवजी भाजप सुरक्षा कायदा असं असायला हवा. कारण भाजपविरोधात जो बोलेल तो जणूकाही देशद्रोही आहे असा त्यांचा समज आह, असे ठाकरे म्हणाले.
-…तर समर्थन दिलं असतं
आम्ही या विधेयकाला समर्थन दिलं असतं, पण त्यात सुधारणा आवश्यक आहे. यामध्ये स्पष्टपणे देशविघातक, देशद्रोही, नक्षवादी याचा उल्लेख करा आणि परत हे विधेयक आणा. पण जर तुम्ही अशा प्रकारे मोघम विधेयक आणलं की त्याला आकार, उकार काहीही नाही. यामध्ये धर आणि उठसूठ टाक आत जे आज चाललेलं आहे. यापूर्वी एक मिसा, टाडा कायदा होता. या कायद्यांचा दुरुपयोग केला गेला. त्याचप्रमाणं याचं स्पष्ट रुप आम्हाला सभागृहात दिसलं. हे विधेयक योगेश कदम यांनी मांडलं जे मूळचे शिवसैनिक, दरेकर, प्रसाद लाड, हेमंत पाटील हे सर्वजण मूळचे शिवसैनिक. यामध्ये एकही मूळचा भाजपचा नेता नव्हता. म्हणजेच यांना जसं धमकावून भाजपत घेतलं तसाच याचा राजकीय दुरुपयोग केला जाईल, असा आमचा समज आणि आक्षेप आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

संबंधित बातम्या

Back to top button