कामगार, कर्मचारी आणि शेतकर्‍यांची जिल्हा कचेरीवर धडक

भर पावसातच निघाला मोर्चा

-केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध
-तीव्र निदर्शनांनंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
अमरावती / 9 जुलै: चार श्रम कायदे आणि केंद्र सरकारची अन्य धोरणे अन्यायकारक असल्याचा आरोप करित आज शेकडो कामगार, कर्मचारी आणि शेतकर्‍यांनी दुपारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. भर पावसात इर्विन चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने करुन घोषणाबाजी केली. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना एक निवेदन सादर केले.
कंद्रीय कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने या आज या देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याअंतर्गत अमरावती येथे संयुकत कामगार-कर्मचारी संघटना कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. सततधार पाउस सुरु असतानाही जिल्ह्यातील कामगार, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. इर्विन चौकातून पायदळ जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करुन सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेउन त्यांना आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केले.
केंद्र सरकारने चार श्रम कायदे रद्द करावे, महाराष्ट्रात प्रस्तावित असलेले जनसुरक्षा विधेयक मागे घेण्यात यावे, सरकारी व अर्धसरकारी विभागांसह सार्वजनिक उद्योग व सेवांमध्ये केले जात असलेले खाजगीकरण बंद करण्यात यावे, कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे धोरण रद्द करावे, अस्थायी कामगारांना सेवेत नियमित करुन त्यांना किमान दरमहा 26 हजार रुपये वेतन तसेच सेवानिवृत्तीनंतर 10 हजार रुपये पेंशन लागू करण्यात यावे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी, रोजगार सेवक व कंत्राटी डॉक्टर आणि परिचारिका यांना सरकारी कर्मचार्‍याचा दर्जा देण्यात यावा व त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेतन व ग्रॅच्युईटी लागू करावी, शेतकर्‍यांच्या शेतमालाच्या खरेदीकरिता किमान आधारभूत दरासंदर्भाने कायदा करण्यात यावा, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, विद्युत स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, शेतकर्‍यांना दिवसा 12 तास अखंडित वीज पूरवठा कृषी पंपासाठी केला जाता, पीएफआरडीए कायदा रद्द करुन सरकारी कर्मचार्‍यांना जूनी पेंशन योजना लागू करावी, सर्व सरकारी विभाग आणि सार्वजनिक उपक्रमांतील रिक्त पदे तातडीने भरण्यात येउन कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, बेरोजगारांना निर्वाह भत्ता लागू केला जावा, नवीन शिक्षण धोरण मागे घ्यावे, शिक्षणाचे बाजारीकरण, केंद्रीयकरण आणि सांप्रदायिकीकरण बंद करावे, शिक्षण आणि आरोग्यासाठी अर्थसंकल्पात मूबलक निधीचे प्रावधान करण्यात यावे, मागासवर्गीयांचा नोकरीतील अनूशेष तात्काळ भरण्यात यावा, वाढलेल्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपायोजना केल्या जाव्या, सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करण्यात यावी, बांधकाम मजूर, घर कामगार, फेरीवाले, ऑटो चालक, उसतोड कामगार आणि असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदाण करुन त्यांना किमान 10 हजार रुपये पेंशन योजना लागू करण्यात यावी, अशा मागण्या जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या.
या आंदोलनात संयुक्त कामगार कर्मचारी संघटनेच्या कृति समिति चे निमंत्रक डी. एस. पवार, सीटू अध्यक्ष सुभाष पांडे, सचिव सुनील देशमुख, उपाध्यक्ष रमेश सोनुले, ऑल इंडिया बैंक एम्प्लॉईज एसो. चे अध्यक्ष पंकज गावंडे, ऑल इंडिया इन्शुरंस एम्प्लॉईज एसो. चे सचिव रविंद्र धुमाळे, आयटक चे अध्यक्ष जे. एम. कोठारी, सचिव, नीलकंठ ढोके, संयुक्त किसान मोर्चा चे निमंत्रक अशोक सोनारकर, अ. भा. किसान सभा चे अध्यक्ष महादेव गारपवार, सचिव श्याम शिंदे, महाराष्ट्र किसान सभा चे अध्यक्ष सतीश चौधरी, सचिव ओमप्रकाश कुटेमाटे, बीकेएमयू चे अध्यक्ष संजय मंडवधरे, सचिव सुनील घटाले व एआईएडब्ल्यूयू चे अध्यक्ष दिलीप छापामोहन आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.
-मोर्चात या संघटनांचा सहभाग
या मोर्चा व आंदोलनात अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, एमएसई वर्कर्स फेडरेशन, आशा व गट प्रवर्तक संघटना (आयटक), ग्राम पंचायत कर्मचारी संघटना , शालेय पोषाहार कर्मचारी संघटना, निर्माण कामगार संघटना, घरकाम मोलकरीन संघटना, लालबावटा शेत मजदूर युनियन, मेडीकल एंड सेल्स प्रतिनिधि संघटना, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, आशा वर्कर्स व गट प्रवर्गक संघटना (सीटू), भवन निर्माण कामगार संघटना (सीटू), वस्त्रोद्योग कामगार संघटना, विदर्भ टेलिकाम वर्कर्स युनियन (सीटू), लालबावटा शालेय पोषाहार कामगार संघटना, आरोग्य मित्र संघटना (सीटू) व विदर्भ जनरल लेबर संगठनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Back to top button