अमरावती जिल्ह्यातील ज्वारीची खरेदी तात्काळ होणार

पालकमंत्र्यांचे खा. बळवंत वानखडेंना आश्वासन

-भेट घेउन विविभ मुद्यांवर केली चर्चा
-पणन विभागासोबत बैठक घेउन निर्देश देणार
अमरावती / 6 जुलै: रब्बी हंगामात अमरावती जिल्ह्यात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली होती. पीकही भरघोस झाले आहे. शेतकर्‍यांच्या ज्वारी मालाची शासकिय खरेदी तात्काळ सुरु करुन त्यांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांना भेटीदरम्यान दिले आहे. या विषयावर वानखडे यांनी पालकमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा करुन ज्वारीची खरेदी सुरु न झाल्याने शेतकर्‍यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींशी त्यांना अवगत केले आणि ज्वारी खरेदी तात्काळ सुरु करण्याची मागणी केली. त्याला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगाम शेतकर्‍यांसाठी चांगला राहीला. ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असल्याने ज्वारी विकण्याकरिता शेतकर्‍यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केली होती. परंतू प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरु न झाल्याने ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांनी खासदार बळवंत वानखडे यांचेकडे खरेदी सुरु करण्याची मागणी केली होती. त्याअनुशंगाने बळवंत वानखडे यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेतली आणि शेतकर्‍यांनी नोंदणी करण्यात आलेल्या ज्वारीची खरेदी तात्काळ करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली.
ज्वारी या पारंपारीक पिकाकडे यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्याचे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. बहुतांश शेतकर्‍यांनी ज्वारीची लागवड केली व उत्पादन घेतले. सामान्य खाजगी बाजारपेठेत ज्वारीला 1200 ते 1500 एवढा भाव मिळत असून सन 2024-25 चा शासनाच्या हमी भावानुसार संकरित ज्वारीला 3180 आणि मालदांडी ज्वारीला 3225 एवढा हमीभाव आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकर्‍याचा कल शासकीय खरेदीकडे जास्त आहे. त्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकर्‍यानी ज्वारी विक्रीबाबत नोंदणी केली असून अद्यापही ज्वारी खरेदी न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण तसेच संभ्रम निर्माण झाला आहे.
तसेच खरीप हंगाप सुरू झाला असून शेतकर्‍यांची ज्वारी खरेदी करून त्यांना आर्थिक आधार देणे आवश्यक आहे. याबाबत खासदार बळवंत वानखडे यांनी 30 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडेसुद्धा याबाबत लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर खासदारांनी आता पालकमंत्र्यांशी नागपूर येथे यासंदर्भाने चर्चा केली व शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पणन विभागाच्या सचिवांसमवेत मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करून ज्वारी खरेदी करण्याबाबत तोडगा काढून लवकरच प्रत्यक्ष ज्वारी खरेदीची प्रक्रिया सुरु करण्यात येईलख असे सांगून खा. वानखडे यांना आश्वस्त केले.

संबंधित बातम्या

Back to top button