बडनेरात दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला

मनपा गांधी मार्केटच्या थरारक घटनेत तीन जखमी

भरवस्तीत चाकूबाजी अन् दगडफेकीने व्यापार्‍यांमध्ये दहशत

ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर लुटमारीचा प्रयत्न

ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बडनेरा/27 नोव्हेंबर – गजबजलेल्या बडनेरा बाजारपेठेत शुक्रवारी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी दुकानांत घुसून लुटमारीचा थरारक प्रयत्न केला. या हल्ल्यात कपडा दुकानदार जीतू उर्फ पुरसू पंजवानी गंभीर जखमी झाले असून त्यांचे नातेवाईक सागर पंजवानी हेही चाकू व दगडाच्या माराने जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड दहशत आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरातील मनपा गांधी मार्केट मध्ये शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे नागरिकांची मोठी वर्दळ सुरू होती. याच गर्दीचा फायदा घेत आठ ते दहा अज्ञात हल्लेखोरांनी बाजारपेठेतील दुकान क्रमांक 11 आणि 12 वर अचानक चाल केली. दुकान क्रमांक 11 मधील पुरुषोत्तम पंजवानी यांच्या स्वामी कापड दुकानात आणि शेजारील केशव पंजवानी यांच्या राधा साडी केंद्रात हे हल्लेखोर शिरले. त्यांनी दुकानात दहशत माजवत रोकड व ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला.
दुकानात घुसलेल्या लुटारूंना रोखण्यासाठी केशव पंजवानी यांचे पुत्र सागर पंजवानी (वय 28) यांनी जीवाची बाजी लावत जोरदार प्रतिकार केला. सागर यांनी हल्लेखोरांना दुकानातून बाहेर पिटाळण्याचा प्रयत्न करताच संतप्त झालेल्या दरोडेखोरांनी त्यांच्यावरच उलट हल्ला चढवला. एका लुटारूने सागर यांच्या पाठीत धारदार चाकूने वार केला. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी बाजूलाच बसणार्‍या चांभाराच्या दुकानाजवळ पडलेले दगड आणि विटा उचलून सागर यांच्यावर जोरदार मारा केला. या झटापटीत स्वामी कापड दुकानाचे संचालक पुरुषोत्तम पंजवानी हे व त्यांचे पुत्र जीतू उर्फ पुरसू पंजवानी (वय 32) हेदेखील हल्लेखोरांच्या तडाख्यात सापडून गंभीर जखमी झाले. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक आणि व्यापारी मदतीसाठी धावून येऊ लागताच गर्दी जमा झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी बाजारपेठेच्या बाजूला असलेल्या शनी मंदिराच्या गल्लीतून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
या प्राणघातक हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जीतू उर्फ पुरसू पंजवानी आणि सागर पंजवानी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. सागर पंजवानी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पुरसू पंजवानी यांच्यावरही रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
बडनेरा पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणेदार पुनीत कुलट यांनी बडनेरा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. पुनीत कुलट हे यापूर्वीही बडनेरा येथे ठाणेदार म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यांना या संपूर्ण परिसराची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची खडा न खडा माहिती असतानाही भरवस्तीत अशा प्रकारे दरोड्याचा प्रयत्न होणे ही सामान्य बाब नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. ठाणेदारांच्या कारकिर्दीवर या घटनेमुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील नागरिकांची आणि व्यापार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

आरोपी अटकेपर्यंत बाजारपेठ बंद
भरबाजारपेठेत व्यापार्‍यांवर झालेल्या चाकूबाजी आणि दगडफेकीच्या निषेधार्थ बडनेरातील सर्वच व्यापारी आक्रमक झाले. घटनेनंतर लगेचच व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद करून या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. बाजारपेठेत शुकशुकाट पसरला असून व्यापार्‍यांमध्ये भीतीचे सावट आहे. जोपर्यंत सर्व हल्लेखोरांना अटक होऊन कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत सर्वधर्म बंदचे आवाहन व्यापारी वर्गातील मान्यवरांनी केले आहे.

चांदणी चौकातही चाकूचा धाक
बडनेरा शहरात गुन्हेगारांची हिंमत वाढल्याचे सलग दुसर्‍या दिवशी दिसून आले. गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास बडनेरा येथील दूरध्वनी केंद्रासमोर चांदणी चौक परिसरात चाकू निघाल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे परिसरात सुमारे दहा मिनिटे गोंधळाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये भीती पसरल्यानंतर काही वेळाने वातावरण शांत झाले होते, मात्र दुसर्‍याच दिवशी बाजारपेठेत चाकूबाजी झाल्याने नागरिक धास्तावले आहेत

Back to top button