नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीत राजकीय भूकंप

2 महिने प्रोसीडिंग रखडवल्याने मुख्याधिकार्‍यांवर ’24 तासांचा’ अल्टिमेटम!

सत्ताधारी गटाचा संताप; जिल्हाधिकार्‍यांकडे शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

नांदगाव खंडेश्वर/26 नोव्हेंबर – नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर येथील प्रशासकीय दिरंगाई आणि निष्काळजीपणाच्या विरोधात आता सत्ताधारी पक्ष गटाने थेट मुख्याधिकार्‍यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
22 सप्टेंबर 2026 रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेचे प्रोसीडिंग (इतिवृत्त) तब्बल दोन महिने उलटूनही अपूर्ण ठेवल्याप्रकरणी उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर यांच्या नेतृत्वात सत्ताधारी सदस्यांनी मुख्याधिकार्‍यांना 24 तासांचा अंतिम इशारा (अल्टिमेटम) दिला आहे. हा वेळकाढूपणा न थांबल्यास थेट जिल्हाधिकार्‍यांकडे शिस्तभंगविषयक कारवाईची मागणी करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे देण्यात आल्याने नगर पंचायत वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?-मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 22/09/2026 रोजी नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा सर्व सदस्यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली होती. या सभेमध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे अनेक ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले होते. ’महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965’ च्या कलम 81 नुसार, सभेचे इतिवृत्त वेळेत लिहून ते पीठासीन अधि कार्‍यांच्या स्वाक्षरी साठी सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, या घटनेला दोन महिने पूर्ण झाले तरी प्रशासनाने किंवा संबंधित कारकुनाने हे प्रोसीडिंग नोंदवहीवर पूर्ण केले नाही, असा गंभीर आरोप सत्ताधार्‍यांनी केला आहे.
विकासकामे ठप्प; जनतेमध्ये तीव्र आक्रोश-प्रोसीडिंग पूर्ण न झाल्यामुळे सभेमध्ये मंजूर झालेल्या लोकहितार्थ आणि विकासकामांच्या ठरावांची अंमलबजावणी करणे प्रशासनाला तांत्रिकदृष्ट्या अशक्य झाले आहे. परिणामी, नांदगाव खंडेश्वर शहरातील अनेक विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरात तीव्र नाराजी पसरली असून, याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसत आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
24 तासांत कारवाई करा, अन्यथा…-सत्ताधारी गटाने मुख्य अधिकार्‍यांना दिलेल्या लेखी निर्देशात स्पष्ट म्हटले आहे की, पुढील 24 तासांच्या आत हे प्रोसीडिंग नियमांनुसार लिहून पूर्ण करावे आणि अंतिम स्वाक्षरीसाठी सत्ताधारी गटाकडे सादर करावे. जर या विहित मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आणि गंभीर प्रशासकीय दिरंगाईची दखल घेऊन थेट माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे शिस्तभंगविषयक कार्यवाहीसाठी अधिकृत अहवाल पाठवण्यात येईल.
पत्रकावर ’या’ प्रमुख लोकप्रतिनिधींच्या स्वाक्षर्‍या:-मुख्याधिकार्‍यांना पाठवण्यात आलेल्या या खळबळजनक पत्रावर उपनगराध्यक्ष श्री. अब्दुल जमीर अब्दुल रहीम, सार्वजनिक बांधकाम सभापती श्री. मोहम्मद रियाज मोहम्मद मुमताज, महिला व बालकल्याण उपसभापती श्रीमती शिला अरुण वाडेकर, स्वीकृत नगरसेवक श्री. मोहम्मद साजिद मोहम्मद शब्बीर, तसेच नगरसेविका सौ. रजियाबी अब्दुल सलाम, सौ. आसिया शेख जमील शेख, सौ. अलमास बी. शेख हारून आणि सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.आता या 24 तासांच्या अल्टिमेटमवर मुख्याधिकारी काय पाऊल उचलतात आणि रखडलेले प्रोसीडिंग पूर्ण होते की हा वाद जिल्हाधिकार्‍यांच्या दारात पोहोचतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button