दहा लाखांची रक्कम वसूल
नातेवाईक, कर्मचार्यांचे जबाब नोंदवले

देवळी पंचायत समितीतील घोटाळा
वर्धा/26 नोव्हेंबर : देवळी पंचायत समिती, देवळीमधील ’धडक सिंचन विहीर’ योजनेतील 23 लाख 20 हजार 6 रुपयांच्या अपहार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीने घोटाळ्याची ही रक्कम स्वतःच्या खात्यातून इतर अनेकांच्या बँक खात्यांवर वळविल्याची माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी देवळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे यांनी गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच पंचायत समितीत ठिय्या मांडून सखोल तपास केला. या कारवाईत निलंबित कृषी विस्तार अधिकारी दिनेश दखणे याचा पुतण्या आणि एका मित्राच्या खात्यातून प्रत्येकी 5 लाख रुपये असे एकूण 10 लाख रुपये वसूल करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे आरोपीने शासकीय निधी परस्पर स्वतःच्या खात्यात वळवल्यानंतर त्यातील काही रक्कम इतर व्यक्तींच्या बँक खात्यात हस्तांतरित केल्याचे तपासात समोर येत आहे. या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी निलंबित अधिकारी दखणे याच्या कार्यालयासह लेखा विभागाचा पंचनामा केला. तसेच, आतापर्यंत आठ ते नऊ जणांचे सविस्तर जबाब नोंदवले असून यामध्ये आरोपीचे नातेवाईक आणि पंचायत समिती कार्यालयातील काही कर्मचार्यांचा समावेश आहे. देवळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे निवडणूक कर्तव्यावर असताना, कृषी विस्तार अधिकारी दिनेश दखणे याने स्टेट बँकेच्या खात्याचे धनादेश पुस्तक परस्पर ताब्यात घेतले. त्यावर बीडीओंची बनावट स्वाक्षरी व शिक्का मारून ’धडक सिंचन विहीर’ योजनेचे 23 लाख 20 हजार 6 रुपये स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवले. लेखापाल अंकित पारीसे यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी दखणे याला तात्काळ निलंबित केले असून, बीडीओ लोखंडे यांच्या फिर्यादीवरून देवळी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





