महिला आरक्षण, परिसीमन विधेयक होणार मंजूर?

पुढील आठवड्यात संसदेचं विशेष अधिवेशन

मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा

नवी दिल्ली/26 नोव्हेंबर : केंद्र सरकारच्या प्रस्तावित ‘डिलिमिटेशन बिला’वरून सध्या देशभरात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणि लोकसभेच्या जागा 543 वरून वाढवून 850 पर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकार डिलिमिटेशन बिल पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत असल्याने विरोधी पक्ष आणि दक्षिण भारतातील राज्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. मात्र असे असतानाच आता लोकसभा आणि राज्यसभेच्या विशेष अधिवेशनाची केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली असून अधिवेशनात डिलिमिटेशन बिलाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी द या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना माहिती दिली की, शासनाने लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांना विनंती केली आहे की, आवश्यक शासकीय कामकाज हाताळण्यासाठी लोकसभा 30 नोव्हेंबर 2026 रोजी आणि राज्यसभा 2 डिसेंबर 2026 रोजी पुन्हा बोलावण्यात यावी. कामकाजाच्या आवश्यकतेनुसार, दोन्ही सभागृहांचे अधिवेशन 3 डिसेंबर 2026 रोजी समाप्त होऊ शकते, अशी माहिती किरेन रिजिजू यांनी दिली. मात्र कामकाज कधी संपेल हे सभागृहासमोर असलेल्या कायदेविषयक कामांच्या गरजेवर आणि तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल, असे किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ असा की, अधिवेशन संपण्याची 3 डिसेंबर ही एक संभाव्य तारीख आहे, अंतिम किंवा निश्चित तारीख नाही. तसेच सरकारने दोन्ही सभागृहे पुन्हा बोलावण्याची विनंती प्रामुख्याने आवश्यकसरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी केली आहे.
पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट रोजी स्थगित झाल्यापासून 103 दिवस उलटले आहेत, मात्र तरीही हे अधिवेशन अधिकृतपणे समाप्त झालेले नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनाची घोषणा न करता लोकसभा आणि विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे आता अशी चर्चा आहे की, या काळात केंद्र सरकार डिलिमिटेशन बिलाशी संबंधित महिला आरक्षणाचे विधेयक मांडू शकते. कारण घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी 543 सदस्यांच्या लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताची (361 मते) आवश्यकता आहे. सध्या एनडीएकडे 320 जागा असून एप्रिल महिन्यानंतर तृणमूल काँग्रेसचे 20 आणि उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार असे विरोधी पक्षांचे 26 खासदार एनडीएच्या गोटात सामील झाले आहेत. असे असले तरीही, डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारला डीएमके (22 जागा) आणि एनसीपी-एसपी (8 जागा) सारख्या पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. त्यामुळे आता विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन बिलाबाबत निर्णय होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

Back to top button