मेळघाटच्या जलविद्युत प्रकल्पावर कायद्याचा बडगा

कंपनीला पंधरा दिवसांत मागितला लेखी खुलासा, वनजमीन ग्रामसभा परवानगीवरून पेटला वाद

पर्यावरण आणि आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर

अमरावती/25 नोव्हेंबर– मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात होऊ घातलेल्या अदानी समूहाच्या 1,500 मेगावॉट जलविद्युत प्रकल्पावरून वाद पेटला असून कंपनीच्या आर्थिक क्षमतेवर आणि पर्यावरण मंजुरीवर कायदेशीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील वैशाली फाल्के-बोबडे यांनी ’अदानी हायड्रो एनर्जी टेन लिमिटेड’ कंपनीला नोटीस पाठवून 16 मुद्द्यांवर 15 दिवसांत लेखी खुलासा आणि कागदपत्रे मागितली आहेत. दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात हा प्रकल्प नको म्हणून वन्यजीव प्रेमींनी हा प्रकल्प इतरत्र हलवण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. 240.61 हेक्टर वनजमिनीचा प्रश्न आणि स्थानिक ग्रामसभांची परवानगी न घेतल्याचा आरोप करत उत्तर न मिळाल्यास राष्ट्रीय हरित लवादात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. चिखलदरा तालुक्यातील आडनदी आणि कामापूर भागात हा भव्य प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. मात्र या प्रकल्पाच्या प्रक्रियेवरवकील वैशाली फाल्के-बोबडे यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. कंपनीची स्थापना झाल्यानंतर अवघ्या 43 दिवसांतच राज्य सरकारसोबत सामंजस्य करार कसा झाला असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कंपनीचे सुरुवातीचे भागभांडवल आणि 8,250 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक यामध्ये मोठी तफावत असताना एवढा मोठा प्रकल्प उभारण्याची आर्थिक आणि तांत्रिक ताकद सरकारने कोणत्या निकषावर तपासली याचा जाब या कायदेशीर नोटिशीद्वारे विचारण्यात आला आहे.मेळघाटचा परिसर हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणार्‍या या प्रकल्पाविरोधात पर्यावरण संघटना आक्रमक झाल्या आहेत. ’वाईल्डलाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी’ या संस्थेने थेट राज्यपालांकडे धाव घेत हा प्रकल्प मेळघाटातून बाहेर हलवण्याची मागणी केली आहे. आमचा विकासाला विरोध नाही पण मेळघाटातील निसर्ग आणि वन्यजीवांचे हक्काचे घर सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे अशी स्पष्ट भूमिका संस्थेचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी मांडली आहे.हा प्रकल्प मेळघाटातील जंगलाच्या अगदी जवळ असल्याने वन्यजीवांचा वावर आणि पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर होणार्‍या परिणामांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची मागणी जोर धरत आहे. या भागात वन हक्क कायदा 2006 आणि पेसा कायदा 1996 लागू असताना स्थानिक ग्रामसभांची संमती घेतली गेली का असा प्रश्नही विचारला जात आहे. सपन नदी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतीचा आणि गावकर्‍यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. प्रकल्पातून मिळणारे 4,800 रोजगार हे कायमस्वरूपी असतील की कंत्राटी पद्धतीचे याचाही खुलासा मागितला आहे. आपण अपारंपरिक ऊर्जा किंवा प्रगतीच्या विरोधात नाही पण आदिवासींच्या हक्कांशी आणि निसर्गाशी जोडलेले निर्णय पारदर्शक असायला हवेत असे वैशाली फाल्के-बोबडे यांनी स्पष्ट केले आहे. दिलेल्या मुदतीत समाधानकारक उत्तर आणि कागदपत्रे सादर न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button