अमरावती शहरातील 875 कोटींच्या अमृत योजनेला गती द्या
जिल्ह्यातील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न

आढावा बैठकीतून आ.रवी राणा यांचे अधिकार्यांना निर्देश
12 तालुक्यांतील कामे लगेच सुरू करण्याचे आदेश
अमरावती/25 नोव्हेंबर- राज्यात पाणीटंचाईचे सावट गडद होत असताना अमरावती जिल्ह्यावर विशेष लक्ष देत आ. रवी राणा यांनी विधानभवनात आश्वासन समितीची आढावा बैठक घेतली. नागरिकांना वेळेत व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सर्व प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, समिती सदस्य आ. तसेच राज्यभरातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धारणी व चिखलदरा यांसह अमरावती जिल्ह्यातील 12 तालुक्यांत विहिरींचा गाळ काढणे, तलावांचे खोलीकरण, टँकरने पाणीपुरवठा व जलसंधारणाची कामे लगेच सुरू करण्याचे ठरले. अमरावती जिल्ह्यातील गावागावात पाण्याची अडचण भासू नये, शेतकर्यांचे व शेतमजुरांचे हाल होऊ नयेत, यासाठी नियोजन काटेकोरपणे राबविण्याचे ठरले. टंचाईच्या काळात कोणत्याही गावात पाण्यासाठीवणवण होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. अमरावती शहरातील 875 कोटी रुपयांच्या अमृत-2 पाणीपुरवठा प्रकल्पाचा आढावा घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. पनवेल-सिडको-जेएनपीटीच्या 493 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. ही कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कामात दिरंगाई करणार्या जीव्हीपीआर कंपनीवर पुन्हा दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची सूचना करण्यात आली.पाणीटंचाईच्या कामांसोबत शेतमजुरांना रोजगार मिळावा म्हणून रोजगार हमीची कामे जोमाने राबविण्यावर भर देण्यात आला. बैठकीनंतर अधिकार्यांना अमरावती जिल्ह्याचा तालुकानिहाय आराखडा तयार करून दर आठवड्याला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. पाण्याच्या स्रोतांची पाहणी करून गरजेनुसार नवीन उपाय शोधण्याचे ठरले. गावकर्यांच्या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. उन्हाळ्यात पाण्याचे संकट वाढू नये म्हणून आतापासूनच तयारी सुरू करण्याचे ठरले. अधिकार्यांनी गावागावात जाऊन कामांचा आढावा घ्यावा असेही बैठकीत ठरले. लोकांना दिलासा मिळावा हेच उद्दिष्ट आता आहे. तयारीला वेग आला.





