पेपरफुटी करणार्‍यांवर 10 कोटींचा दंड

10 वर्षांपर्यंत कारावास आणि मालमत्ता जप्ती

उच्चस्तरीय समितीच्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी
परीक्षा देणार्‍या उमेदवारांना संपूर्ण शुल्क परत
विशेष कृती दल आणि जलदगती न्यायालये

मुंबई /24 नोव्हेंबर – राज्यातील नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल सादर केला आहे. यामध्ये पेपरफुटी करणार्‍या टोळ्यांना 7 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि किमान 10 कोटी रुपये दंडाची शिफारस केली आहे. तसेच परीक्षा देणार्‍या प्रामाणिक उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत देण्याचा आणि खटले तीन महिन्यांत निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालये उभारण्याचा मोठा प्रस्ताव समितीने मांडला आहे.
स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य सरकारने 4 सप्टेंबर 2026 रोजी अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने 4 नोव्हेंबर 2026 रोजी गट-क परीक्षेचा पहिला अहवाल दिला होता. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2026 रोजी दुसरा अहवाल सरकारकडे सुपूर्द केला आहे. चार टप्प्यांत सादर होणार्‍या या अहवालातील दुसर्‍या टप्प्यात कायदे कडक करण्यावर आणि विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यावर भर दिला आहे.
सध्याच्या 2024 च्या कायद्यात मोठे बदल करून गुन्हेगारांवर जरब बसवण्याचे ठरवले आहे. संघटित गुन्हेगारी करणार्‍यांना आता 5 ऐवजी 7 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 कोटी ऐवजी किमान 10 कोटी रुपये दंड ठोठावण्याची शिफारस आहे. तसेच परीक्षा घेणार्‍या खासगी संस्थांनी गैरप्रकार केल्यास त्यांना 1 कोटी ऐवजी 5 कोटी दंड आणि 4 ऐवजी 8 वर्षे काळ्या यादीत टाकले जाईल. या संस्थांचे संचालक आणि व्यवस्थापकांनाही 5 ते 10 वर्षे कैद आणि 5 कोटी दंड भोगावा लागेल. परीक्षेत कॉपी किंवा अनुचित साधने वापरणार्‍या विद्यार्थ्यांनाही 3 ऐवजी 5 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि 50 लाख रुपये दंडाची तरतूद सुचवली आहे. गैरप्रकारांतून कमावलेली जमीन, घरे, बौद्धिक संपदा यांसह डिजिटल आणि आभासी मालमत्ताही सरकार जप्त करणार आहे.
या गुन्ह्यांचा तपास आता खालच्या अधिकार्‍यांऐवजी जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि शहरात पोलीस उपायुक्त दर्जाचे वरिष्ठ अधिकारी करतील. गंभीर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र विशेष कृती दल नेमले जाईल. तसेच जुने प्रलंबित खटले विशेष जलदगती न्यायालयांकडे वर्ग करून तीन महिन्यांत निकाली काढण्याची शिफारस अहवालात केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला प्रत्यक्ष हजर राहणार्‍या सर्व उमेदवारांचे संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याचा विचार करावा असे समितीने म्हटले आहे. उत्तरतालिकेवर विद्यार्थ्यांनी घेतलेली हरकत मान्य झाल्यास त्यासाठी भरलेले शुल्कही परत मिळेल. उमेदवारांना वारंवार कागदपत्रे अपलोड करावी लागू नयेत म्हणून महाओळख क्रमांक किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी सुविधा दिली जाईल. यामुळे शुल्क परतावा थेट आधार जोडलेल्या बँक खात्यात जमा करणे सोपे होणार आहे. परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय, जिल्हा पातळी आणि प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर असे तीन स्तरीय नियंत्रण कक्ष उभारले जातील. जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अखत्यारीत कायमस्वरूपी परीक्षा शाखा आणि समन्वय समिती नेमली जाईल. या समितीत पोलीस अधीक्षक, शिक्षण, परिवहन आणि कोषागार विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील.
प्रत्येक जिल्ह्यात चांगल्या शाळा आणि महाविद्यालयांची परीक्षा केंद्र पेढी तयार करून तिची नियमित तपासणी केली जाईल. या इमारती ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिले जातील. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव गृह आणि महाराष्ट्र सायबर विभागाच्या मदतीने स्वतंत्र सुरक्षा आराखडा तयार केला जाईल. सूक्ष्म संवाद उपकरणे, अंगावर घालण्याचे छुपे कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर थांबवण्यासाठी आयोगात स्वतंत्र सायबर सुरक्षा कक्ष आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी नेमण्याची महत्त्वपूर्ण शिफारस या अहवालात केली आहे.
वेळापत्रक आणि भरती प्रक्रियेत मोठी सुधारणा -विविध सरकारी विभागांकडून रिक्त पदांची माहिती वेळेत मिळत नसल्याने परीक्षांचे वेळापत्रक कोलमडते. यासाठी आयोगाने एकात्मिक मागणीपत्र प्रणाली विकसित करावी. 2 डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार सर्व विभागांनी दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत रिक्त पदांची माहिती देणे बंधनकारक राहील. तसेच आयोगाने दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करावे, अशी शिफारस केली आहे.

Back to top button