खासगी ठेकेदाराला भवन देण्याचा निर्णय संशयाच्या भोवर्यात
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या ठेक्यावर प्रश्नचिन्ह

आ. प्रवीण पोटे पाटील यांचे आयुक्तांना पत्र; 11 मुद्द्यांवर मागितला हिशोब
देखभाल खर्चापासून उत्पन्नापर्यंत सर्व माहिती उघड करण्याची मागणी
अमरावती/23 नोव्हेंबर – कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या संचालनाचा आणि देखभालीचा कारभार नेमका कोणाच्या हातात आहे, या प्रश्नावरून आता महापालिका प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून एकाच संस्थेला भवनाचा ठेका देण्यात आल्याने या व्यवहारातील अटी, महापालिकेला मिळणारे उत्पन्न, ठेकेदाराने भरलेली रक्कम आणि देखभालीवरील खर्च याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आ. प्रवीण पोटे पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून 11 महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर माहिती मागितली आहे. त्यामुळे सांस्कृतिक भवनाच्या ठेक्याचा संपूर्ण कारभार चर्चेत आला आहे.
आ. पोटे पाटील यांनी पत्रात नमूद केले की, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाची उभारणी शासनाने सार्वजनिक वापरासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून केली आहे. हे भवन अमरावती महापालिकेच्या अखत्यारीत असतानाही खासगी ठेकेदाराला भाडेपट्ट्याने देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे महापालिकेला आतापर्यंत किती उत्पन्न मिळाले आणि भवनाच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोण पार पाडत आहे, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. भवनाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, बांधकामानंतर ते खासगी ठेकेदाराकडे कधी सोपविण्यात आले, ठेका किती वर्षांसाठी देण्यात आला आणि त्यानंतर किती वेळा मुदतवाढ देण्यात आली, याची माहिती मागण्यात आली आहे. तसेच दर 5 वर्षांनी भाडे किंवा शुल्कात किती टक्के वाढ करण्याची अट आहे, यासह संपूर्ण कराराची प्रमाणित प्रत देण्याची मागणी करण्यात आली आहे. ठेका मिळाल्यापासून आतापर्यंत महापालिकेला मिळालेल्या एकूण उत्पन्नाचा आणि ठेकेदाराने दरवर्षी जमा केलेल्या रकमेचा तपशीलही मागविण्यात आला आहे. विशेषतः 2026 पर्यंत ठेकेदाराने किती रक्कम भरली, याचा स्पष्ट हिशेब देण्यास सांगितले आहे. भवनाच्या सद्यस्थितीबाबत नाट्यकलाकार, रंगभूमीप्रेमी आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याचेही पत्रात नमूद आहे. या तक्रारींवर महापालिकेने कोणती कारवाई केली, पहिल्या दुरुस्तीवर किती खर्च झाला आणि तो खर्च महापालिकेने केला की ठेकेदाराने, याचाही खुलासा मागितला आहे. शहरात अनेक नाट्य व सांस्कृतिक संस्था असताना एकाच ठेकेदाराची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली, त्याला या क्षेत्रातील अनुभव किती आहे, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. आता या पत्रानंतर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





