वनसंपदेचा बळी देऊन विकास साधणार का – डॉ. सुनिल देशमुख
मेळघाटच्या जलविद्युत प्रकल्पावर सरकारला जाब

* 4,800 रोजगारांच्या दाव्याची सत्यता तपासा
* 2003 मध्ये 400 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प रद्द करण्यात आला
अमरावती/23 नोव्हेंबर – मेळघाटच्या समृद्ध वनसंपदेवर आणि जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता असलेल्या प्रस्तावित 1,500 मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देताना सरकारने पर्यावरणाचा विचार केला आहे का, असा सवाल माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला. 2003 मध्ये पर्यावरणीय कारणांमुळे याच परिसरातील 400 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. मग आता त्यापेक्षा जवळपास चारपट मोठ्या प्रकल्पाला मंजुरी देण्याची प्रक्रिया कोणत्या आधारावर सुरू आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मेळघाट हा केवळ वीज उत्पादनाचा भाग नसून वनसंपदा, वन्यजीव आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर आहे. यापूर्वी पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रस्तावित प्रकल्पाला नकार देण्यात आला होता. आता त्याच भागात मोठ्या क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू असल्याने पर्यावरणीय परिणामांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या प्रकल्पातून 4,800 कायमस्वरूपी रोजगार मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मोठ्या जलविद्युत प्रकल्पांच्या उभारणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने प्रत्यक्षात इतक्या मोठ्या संख्येने कायमस्वरूपी नोकर्या उपलब्ध होणार का, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. रोजगाराच्या आकडेवारीचा सविस्तर खुलासा सरकारने करावा, अशी मागणीही त्यांनी केली. प्रकल्पाची मंजुरी प्रक्रिया, पर्यावरणीय परिणामांचा अहवाल आणि रोजगाराच्या दाव्यांची माहिती सार्वजनिक करावी. विकासाच्या नावाखाली मेलघाटच्या नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होऊ नये, अशी भूमिका डॉ. देशमुख यांनी मांडली.





