अमरावतीत हॉकी स्पर्धेत मुंबई पोलिस विजेता

राज्यातील 22 संघांचा सहभाग

विजेत्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरव

अमरावती/23 नोव्हेंबर – शहरातील एस.पी.जी. अब्दुल कलाम क्रीडांगणावर यंग स्टार संघाच्या वतीने 18 ते 22 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हॉकी स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. अंतिम सामन्यात मुंबई पोलिस संघाने दमदार खेळ करत 3-0 गोलने विजय मिळवून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध शहरांमधील एकूण 22 संघांनी सहभाग घेतला. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी कौशल्य, शिस्त आणि सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. अमरावतीच्या 12 संघांसह मुंबईचे 2, नागपूरचे 3, यवतमाळ, चंद्रपूर, भुसावळ, इस्लामपूर आणि इटारसी येथील संघ मैदानात उतरले होते. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना बाहेरगावच्या संघांसोबत खेळण्याची आणि आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली.
खेळाच्या मैदानातून घडते सक्षम पिढी
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे युवकांचा मैदानी खेळांकडे कल कमी होत आहे. अशा वेळी हॉकीसारख्या खेळांच्या स्पर्धा युवकांना मैदानाशी जोडण्याचे काम करतात. शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, शिस्त आणि सांघिक भावना वाढविण्यासाठी अशा स्पर्धा नियमित व्हाव्यात. अमरावतीत खेळाडूंची कमतरता नसून त्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यंग स्टार संघाचा पुढाकार यासाठी महत्त्वाचा ठरला.

Back to top button