शहराच्या विकास आराखड्याची मूळ फाइल गायब
दोन महिन्यांपासून नगरसेवकांचे हेलपाटे; प्रशासनाकडून पुणे-मुंबईत शोध सुरू

नऊ विकास आरक्षणे हटवल्याच्या चर्चेनेही संशय
अमरावती/23 नोव्हेंबर – शहराच्या पुढील 20 वर्षांच्या विकासाची दिशा ठरविणार्या विकास आराखड्याच्या निविदा प्रक्रियेची मूळ फाइलच अमरावती महानगरपालिकेत उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकास नियोजनाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे दोन महिन्यांपासून मागूनही मिळत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरसेवक चंदू खेडकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नगररचना विभागाचे सहसंचालक (एडीटीपी) शुभम वाकचौरे यांनी सभागृहात फाइल उपलब्ध नसल्याची कबुली दिली. ही कागदपत्रे पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांतून मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, शहराच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाची फाइल महानगरपालिकेतच नसल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून चंदू खेडकर विकास आराखड्याच्या निविदा प्रक्रियेतील संपूर्ण कागदपत्रे मिळावीत, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी वारंवार पत्रे देऊन महापौरांचेही लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर सभागृहात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शुभम वाकचौरे यांनी संबंधित कागदपत्रे सध्या महानगरपालिकेत उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर खेडकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कागदपत्रे मिळविण्यासाठी दोन महिने लागत असतील तर पुणे आणि मुंबई ही अमेरिका नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. निविदा प्रक्रियेतील सर्व कागदपत्रे मागितली असताना प्रशासनाने केवळ 3 निविदाधारक कंपन्यांची नावे आणि दूरध्वनी क्रमांक दिल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात नगरसेवक अनिल अग्रवाल यांनीही नगररचना विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.





