महापालिकेत कर्मचार्यांचे बेमूदत आंदोलन सुरु
संजय गव्हाळे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

महापालिकेचे कामकाज प्रभावित
सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांना शिविगाळ केल्याने वातावरण तापले
अमरावती /23 नोव्हेंबर- महापालिकेतील सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या कार्यालयात झालेल्या कथित मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणावरून कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. नगरसेवक संजय गव्हाळे यांचे सदस्यत्व रद्द करावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अधिकारी-कर्मचार्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, या मागण्यांसाठी महानगरपालिकेत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनामुळे महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाला असून प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला आहे.
दस्तुरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 3 मधील कर वसुलीच्या कारवाईदरम्यान नगरसेवक संजय गव्हाळे आणि सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्यात वाद झाला. या वादातून बोबडे यांच्यासोबत मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. बोबडे यांनी 20 नोव्हेंबर रोजी संघटनेला लेखी माहिती देऊन घटनेचा तपशील कळविला होता. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून नगरसेवक संजय गव्हाळे आणि अन्य आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 132, 121, 221, 324 (4), 296 आणि 3 (5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 1002/2026 असा आहे. कर्मचारी संघटनेने सदस्यत्व रद्द करण्यासह कठोर कारवाईची मागणी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात रमेश पांडे, राजेश उसारे, आकाश तीर्थकर यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले.
कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
महापालिका अधिकारी आणि कर्मचार्यांवर कार्यालयातच मारहाण, शिवीगाळ किंवा धमकावण्याचे प्रकार घडत असतील, तर कामकाजावर परिणाम होण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अशा घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करून कर्मचार्यांना निर्भयपणे काम करता येईल, असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.





