अदानी समूहाच्या प्रकल्पाला उबाठा-शिवसेनेचा तीव्र विरोध
झाडांची कत्तल रोखण्यासाठी शिवसैनिकांची धडक

बांधावर तोडफोड करून काम बंद पाडले
अमरावती /23 नोव्हेंबर- मेळघाटातील अदानी समूहाच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रकल्पासाठी झाडांची कत्तल आणि जंगलाचे नुकसान सहन केले जाणार नाही, असा इशारा देत शिवसैनिकांनी प्रकल्पस्थळी धडक देऊन बांधावर तोडफोड केली आणि काम बंद पाडले. वनसंपदा, वन्यजीव आणि पर्यावरणाला हानी पोहोचल्यास गावापासून मंत्रालयापर्यंत आंदोलन छेडण्याचा निर्धारही व्यक्त केला.
मेळघाटातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी प्रकल्पस्थळी पोहोचून कामाची पाहणी केली. यावेळी झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करीत संबंधित अधिकार्यांना जाब विचारण्यात आला. प्रकल्पाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या बांधावर तोडफोड करून काम रोखण्यात आले. जंगलातील झाडे तोडण्याचे काम सुरू राहिल्यास संबंधित अधिकारी आणि कामगारांना त्याच ठिकाणी रोखले जाईल, असा इशारा पराग गुडधे यांनी दिला. मेळघाटातील नैसर्गिक संपत्ती आणि जंगलांचे संरक्षण करण्यासाठी शिवसेना संघर्ष करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात आशीष वटाणे, काळमेघ, शिवराज चौधरी, चेतन जवंजाळ, अशिन नागे, प्रमोद धनोरकर, सागर वटाणे, सचिन ठाकरे, राहुल गावंडे, सुमित घोगे, प्रतीक कसकर, मुन्ना शर्मा यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
जंगल रक्षणासाठी संघर्षाचा इशारा
मेळघाटातील वनसंपदा आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारा प्रकल्प राबवू देणार नाही. झाडांची कत्तल थांबवून प्रकल्पाच्या कामाची चौकशी करावी. प्रशासनाने दखल न घेतल्यास गावापासून मंत्रालयापर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला.





