कापूस चोरीने शेतकर्यांची चिंता वाढली
शेतातील पिकावर चोरट्यांचा डोळा

* रात्रंदिवस राखण, शेतकर्यांवर संकट
अमरावती / 22 नोव्हेंबर- आधीच निसर्गाचा लहरीपणा, पिकांचे नुकसान आणि वाढता शेतीखर्च यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांसमोर आता कापूस चोरीचे नवे संकट उभे ठाकले आहे. गाववाडी परिसरातील शेतशिवारात कापूस चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. शेतात मेहनतीने पिकवलेला कापूस चोरट्यांकडून लंपास केला जात असून, चोरी केलेला कापूस दुसर्या शेतात लपवून ठेवल्याची माहिती समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकर्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आधीच रात्रंदिवस शेतात जागून राखण करावी लागत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण, पाण्याची व्यवस्था, वाढता खर्च आणि निसर्गाच्या संकटांशी झुंज देताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात आता कापूस चोरीच्या घटनांनी डोकेदुखी आणखी वाढवली आहे. शेतात कापूस वेचणीला आला असताना चोरीच्या प्रकारामुळे मेहनत आणि खर्च वाया जाण्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे. शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकर्यांना स्वतःच्या शेतावर लक्ष ठेवावे लागत असून, रात्रीची राखण करण्याची वेळ आली आहे. चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात नाराजी वाढत असून, शेतातील कापसाचे संरक्षण करण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. निसर्गाच्या संकटातून पीक वाचवायचे, वन्यप्राण्यांपासून संरक्षण करायचे आणि आता चोरट्यांपासूनही कापसाची राखण करायची, अशा दुहेरी-तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.





