गुरुनानक जयंतीनिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाही विनामूल्य; वर्षभरात 53 रुग्णांना नवी दृष्टी

22 नोव्हेंबरला दीप हॉस्पिटलमध्ये आयोजन; चष्म्यांचेही मोफत वाटप
अमरावती / 19 नोव्हेंबर- गरजू रुग्णांना मोतीबिंदूच्या आजारातून मुक्त करून त्यांना पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळावी, या उद्देशाने गुरुनानक ज्योत सेवा ट्रस्टने सामाजिक कार्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गुरुनानक जयंतीच्या 557 व्या प्रकाशपर्वानिमित्त रविवार, 22 नोव्हेंबर रोजी अमरावतीत मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची तपासणी करून गरजेनुसार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाही विनामूल्य करण्यात येणार आहेत. तसेच गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे, ट्रस्टने गेल्या एका वर्षात 53 रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून त्यांना नव्याने पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या शिबिराचे आयोजन बेलपुरा मार्गावरील दीप हॉस्पिटल, चिंचफैल येथे करण्यात आले आहे. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रगती बनसोड आणि डॉ. दिनेश वरंदानी हे शिबिरात रुग्णांची तपासणी करणार आहेत. डोळ्यांच्या तक्रारी असलेल्या तसेच मोतीबिंदूचा त्रास जाणवणार्या गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी केले आहे. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने ट्रस्टच्या सामाजिक कार्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात गरजू रुग्णांना उपचार मिळावेत आणि पैशांअभावी कोणाचीही दृष्टी उपचाराविना जाऊ नये, यासाठी ट्रस्टने पुढाकार घेतला. दानशूर व्यक्ती आणि सहकार्य करणार्या नागरिकांच्या मदतीने आतापर्यंत 53 रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. यापुढेही हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार ट्रस्टने व्यक्त केला आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणार्या दात्यांचे आणि दोन्ही डॉक्टरांचे ट्रस्टने आभार मानले. पत्रकार परिषदेला मनजीतसिंग रिंकू होरा, शरणपालसिंग अरोरा, प्रल्हाद साहनी, हरबक्षसिंग उबेेजा, हरभजनसिंग सलुजा, रिंकू बग्गा, सतिंदरसिंग लोटे, उमंग मोंगा, निर्मलसिंग खालसा, महेश हेमराजानी, सुरेंद्र पोपली उपस्थित होते.





