मालमत्ता दलालाचे अपहरण; कुटुंबाला धमकी

दोन दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून दिली होती धमकी

घरातून बोलावून नेले पतीला सीसीटीव्हीत घटना कैद

अमरावती/19 नोव्हेंबर – मालमत्ता खरेदी-विक्रीचे काम करणारे नीलेश तांगडे यांना तिघांनी मिळून घरातून बोलावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी दूरध्वनीवरून धमकी देत कुटुंबाला संपविण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आरोपींनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरासमोर येऊन नीलेश यांना सोबत नेले. या संपूर्ण प्रकाराचे चित्रण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत झाले असून, पती बेपत्ता झाल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी प्रविण जैन, अर्जुन आणि अभिजीत या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीतील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या पार्वतीनगर क्रमांक 3 मधील मालू ले-आऊट परिसरात 17 नोव्हेंबर रोजी रात्री 8.10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नीलेश तांगडे हे याच परिसरात वास्तव्यास असून मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नी पद्मा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दोन दिवस आधी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी प्रविण जैन (44) आणि अर्जुन (35) यांनी नीलेश यांना दूरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी काम पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत अन्यथा कुटुंबाला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर 17 नोव्हेंबरच्या रात्री अर्जुन आणि अभिजीत (27) हे दोघे नीलेश यांच्या घरासमोर आले. त्यावेळी पद्मा घरी नव्हत्या. दोघांनी नीलेश यांना घराबाहेर बोलावले आणि सोबत घेऊन गेले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रणात दोघे नीलेश यांना घेऊन जात असल्याचे दिसत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी प्रविण जैन यांच्या भ्रमणध्वनीवरून नीलेश यांनी पत्नीला संपर्क साधला होता. आपण प्रविण जैन यांच्यासोबत असून दीड तासात घरी परत येऊ, असे त्यांनी सांगितले होते. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे पद्मा यांनी अर्जुन याला दूरध्वनी करून पतीबाबत विचारणा केली. त्यावर अर्जुन याने आपण नीलेश यांना नेले नसल्याचे सांगत, काय करायचे ते करून घ्या, असे उत्तर दिले. त्यानंतर त्याने दूरध्वनी बंद केला. यावेळी तक्रारदार महिलेलाही धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. नीलेश यांचे अपहरण करून त्यांना अज्ञात ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याचा संशय पत्नीने व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 140 (3), 351 (2) आणि 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून नीलेश तांगडे यांचा शोध घेतला जात आहे.

Back to top button