उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

टेक-ऑफपूर्वीच वैमानिकाच्या लक्षात आला बिघाड

शिंदे कारने पुण्याच्या दिशेने रवाना

सोलापुर/19 नोव्हेंबर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौर्‍यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. कार्तिकी यात्रेची पाहणी करून पुढील प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत असताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आढळला. त्यामुळे वैमानिकाने खबरदारी घेत उड्डाण रद्द केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्तेमार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी यात्रेची पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने पुढील प्रवास करणार होते. मात्र, उड्डाणापूर्वीच वैमानिकाच्या लक्षात हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड आला. प्राथमिक माहितीनुसार, हेलि कॉप्टरच्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता वैमा निकाने उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला. हेलि कॉप्टरचे उड्डाण रद्द झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली. जिल्हाधिकार्‍यांच्या विनंतीनंतर एकनाथ शिंदे रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती शिवसेनेचे अमोल शिंदे आणि आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये यापूर्वीही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गुजरात दौर्‍यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले होते.तसेच, मुंबईहून मुरबाडला जात असताना खराब हवामान आणि धुळीच्या वादळामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्या वेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने वळवले होते.पंढरपूरमधील ताज्या घटनेनंतर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उपमुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टर मधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आल्यानंतर दिलासा मिळाला.
कार्तिकी वारीसाठी 5 कोटींचा निधी?- कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात येणार्‍या लाखो वारकर्‍यांना सुर क्षित, स्वच्छ आणि उत्तम सुविधा मिळ ाव्यात, यासाठी राज्य सरकार आणि पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी नगरपालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आणि निवास व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळासह आधुनिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आधी मोटार सायकलवर स्वार होऊन, तर चंद्रभागेच्या पात्रात बोटीत बसून फेरफटका मारत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकर्‍यांसाठी केलेल्या विविध सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला सर्वंकष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांना प्राधान्य देण्यात आले आहे. वारकर्‍यांना शुद्ध मिनरल वॉटर उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यात्रा काळात आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली असून, विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचीही शिंदे यांनी पाहणी केली. भाविकांच्या सुविधांसाठी स्वच्छता कर्मचारी, यंत्रसामग्री आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शौचालये आणि स्नानगृहांची दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आज शिंदे यांनी चंद्रभागेच्या पात्रात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची स्वतः पाहणी करून ती स्वच्छ आहेत अथवा नाहीत हे तपासले. स्वच्छतागृह स्वच्छ असून पुरेशा पाण्याची व्यवस्था असल्याचे पाहून त्यांनी याबाबत आपण समाधानी असल्याचे स्पष्ट केले.

Back to top button