गोकुळचे दूध 6 रुपयांनी महागले

संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय

कोल्हापूर /19 नोव्हेंबर: राज्याच्या राजकारणात लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरलेली कोल्हापूर गोकुळ (ॠेर्ज्ञीश्र) दूधसंघाच्या निवडणुकीनंतर अखेर तिथे चेअरमनपदाची निवडणूक संपन्न झाली. महायुतीच्या नेतृत्वात माजी आमदार शिवाजी पाटील यांना गोकुळच्या चेअरमनपदी संधी मिळाली आहे. त्यामुळे, संचालकांच्या पहिल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या काही महिन्यात दूध दरांत होत असलेल्या वाढीमुळे गोकुळचेही दर वाढणार असल्याची चर्चा होती. अखेर, पहिल्याच बैठकीत गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ करण्यात आली आहे.
गोकुळ दुध संघाच्या म्हशीच्या दूध विक्री दरात तब्बल 6 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर म्हशीच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, शेतकर्‍यांना आता प्रति लिटरमागे तीन रुपये वाढीव दर मिळणार आहे. तर, गाईच्या दूध खरेदी आणि विक्रीमध्ये प्रत्येकी 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या गोकुळच्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूध संघाची 70 कोटींची तूट भरून काढण्यासाठी नवनियुक्त चेअरमन आणि संचालक मंडळाने दूध विक्री दरात मोठी वाढ केली असून आजपर्यंतची ही सर्वात मोठी वाढ असल्याचं दिसून येत आहे.

Back to top button