‘मत वाचवा देश वाचवा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मतदारांच्या हक्कांसाठी काँग्रेसची जनजागृती

मतदार यादीतील त्रुटींवर नागरिकांशी थेट संवाद
अमरावती/18 नोव्हेंबर – लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणे आणि मतदार यादीत त्याचे नाव कायम असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘मत वाचवा-देश वाचवा’ अभियानाला यशोदा नगर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी (18 नोव्हेंबर) यशोदानगर चौकात आयोजित दुसर्या चौपाळीत काँग्रेस पदाधिकार्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती केली. मतदार यादीतील त्रुटी, पात्र मतदारांची नावे वगळणे, मतदानातील गैरप्रकार आणि विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेतील संभाव्य चुका यावर नागरिकांनी आपले प्रश्न मांडले.
या चौपाळीत सामान्य नागरिक, मजूर, कामगार, महिला आणि तरुणांनाही आपले प्रश्न व समस्या मांडण्याची संधी देण्यात आली. मतदार यादीत स्वतःचे नाव तपासणे, नावात चूक आढळल्यास निवडणूक अधिकार्यांकडे तक्रार करणे आणि मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विलास इंगोले आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी नागरिकांना संबोधित केले. लोकशाहीत जनतेचे मत ही सर्वांत मोठी ताकद असून कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये, असे त्यांनी सांगितले. मतदार यादीतील चुका दूर करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची गरजही व्यक्त केली. चौपाळीदरम्यान भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘ज्ञानेश किसका लाल है, मोदी का दलाल है’, ‘मोदी हटाव, देश बचाव’, ‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’, ‘वोट चोर गद्दी छोड’ आणि ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अमरावती शहरातील प्रत्येक प्रभागात चौपाळी घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक विक्की वानखडे आणि अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन काळे यांनी केले. कार्यक्रमाला महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे, पंकज मेश्राम, विठ्ठल मरापे, जयश्री मरापे, अनिकेत ढेंगले, कलीम शाह, योगेश घोडेस्वार, रणधीर कापसीकर, सुमेध जामनेकर, अभि खंडारे, प्रशिक चव्हाण, शुभम मेश्राम अजय रामटेके, अनिल फुलझेले, उमेश वानखडे, प्रकाश कोकणे, बाबू काळे, अंतुल जवंजाळ, शरद जवंजाळ, राजू जवंजाळ, प्रीतम तेलमोरे, अनुज मनवत, विजय बोरखडे, अनिकेत मोळाम आणि प्रशिक तेलमोरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक प्रभागात मतदार जागृतीचा निर्धार मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव वगळले गेले असल्यास किंवा चुकीची नोंद आढळल्यास निवडणूक अधिकार्यांकडे तक्रार करावी. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी अमरावतीच्या प्रत्येक प्रभागात चौपाळी घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे.





