राजकमल रेल्वे उड्डाणपुलाचे पाडकाम युद्धपातळीवर

बेलपुर्‍याकडील मार्ग बंद करून यंत्रांच्या मदतीने कामाला वेग

रात्रीच्या वेळी डंपरमधून मलबा उचलणार

अमरावती/18 नोव्हेंबर – शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला आणि 125 कोटी रुपये खर्चून नव्याने उभारण्यात येणार्‍या राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या पाडकामाला अखेर वेग आला आहे. महापालिकेकडून बेलपुर्‍याच्या दिशेने असलेला पुलाचा भाग पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील दीड ते दोन महिन्यांत संपूर्ण जुना पूल हटविण्याचे नियोजन आहे. दिवसा यंत्रांच्या मदतीने मलबा गोळा केला जात असून, रात्री डंपरमधून तो उचलून नेला जाणार आहे. डिसेंबर 2027 पर्यंत नव्या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आ. सुलभा खोडके यांनी 16 नोव्हेंबर रोजी पुलाची पाहणी केल्यानंतर पाडकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आज दुसर्‍या दिवशीही यंत्रांच्या सहाय्याने काम सुरू होते. यावेळी आ. सुलभा खोडके, यश खोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिका आणि संबंधित अधिकार्‍यांनी त्यांना कामाची माहिती दिली. 24 ऑगस्ट 2025 रोजी जुना पूल धोकादायक अवस्थेत असल्याने त्यावरील वाहतूक अचानक बंद करण्यात आली होती. त्यानंतर मट्टे असोसिएट्स या कंपनीने रेल्वे परिसरावरील पुलाचा वरचा भाग पाडला होता. मात्र, निधीअभावी पुढील काम रखडले होते. आता 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर माहोरे आणि एल अँड टी समूह, पुणे यांच्या माध्यमातून उर्वरित पाडकाम सुरू झाले आहे. बेलपुर्‍याकडून रेल्वे स्थानक चौकाकडे जाणारा मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, बेलपुरा आणि रेल्वे स्थानक चौकाला जोडणार्‍या या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तो जुन्या पद्धतीऐवजी खांबांवर उभा राहणार असून खालचा भाग मोकळा राहणार आहे. बांधकामाच्या काळात दुकानदारांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. पाडकामातील मलबा नेहरू मैदान आणि सायन्सकोअर मैदान येथे जमा केला जाणार आहे.

Back to top button