हबीब नगरात सिलेंडरचा स्फोट, घराला आग

मुलीच्या लग्नाचे साहित्य जळालेे

अग्निशमन पथकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

अमरावती /18 नोव्हेंबर- मुलीच्या लग्नासाठी अनेक वर्षांपासून कष्ट करून जमवलेली पुंजी, लग्नासाठी खरेदी केलेले साहित्य आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्याने एका गरीब कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. वलगाव मार्गावरील आझादनगर परिसरातील अलहिलाल कॉलनीत बुधवारी दुपारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर घराला भीषण आग लागली. या आगीत मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे, हुंड्याचे साहित्य आणि भविष्यासाठी डब्यात ठेवलेली रोख रक्कमही जळाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
आझादनगर परिसरातील नाल्याजवळ असलेल्या अलहिलाल कॉलनीत एका गरीब कुटुंबाचे घर आहे. बुधवारी दुपारी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला आणि काही क्षणांतच घराला आगीने वेढले. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. विशेष म्हणजे या कुटुंबातील मुलीचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते. तिच्या लग्नासाठी मोठ्या कष्टाने खरेदी केलेले कपडे, घरगुती साहित्य आणि हुंड्याच्या वस्तू आगीत नष्ट झाल्या. आयुष्यभराची कमाई काही क्षणांत राख झाल्याने कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनेची चौकशी सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून या कुटुंबाला आर्थिक मदत आणि आवश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे. या कठीण प्रसंगी शासनासह दानशूर नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button