आरोग्य कार्यालयाच्या दारातच कचर्याचा ढीग
मनपा कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कचरा त्वरित उचलण्याची आरोग्य कर्मचार्यांची मागणी
अमरावती/17 नोव्हेंबर– काँग्रेस नगर रस्त्यावरील अमरावती तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून महापालिका कर्मचार्यांनी हा कचरा त्वरित उचलावा अशी जोरदार मागणी येथील आरोग्य कर्मचार्यांनी केली आहे.
अमरावती तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवेचे नियंत्रण करणार्या या गट सार्वजनिक आरोग्य कक्षाच्या कार्यालयात दररोज शेकडो नागरिक, रुग्ण आणि कर्मचारी विविध कामानिमित्त येत असतात. संपूर्ण तालुक्याला स्वच्छतेचा आणि आरोग्याचा संदेश देणार्या या महत्त्वाच्या कार्यालयाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पालापाचोळा, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद आणि इतर टाकाऊ साहित्य साचून मोठे ढीग तयार झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासूनहा कचरा उचलला गेला नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. कचर्यामुळे या भागात डास आणि माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्याच दारात अशी अस्वच्छता असल्याने कामावर येणार्या कर्मचार्यांना आणि नागरिकांना नाक मुठीत धरून कार्यालयात प्रवेश करावा लागत आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन येथील संपूर्ण कचरा त्वरित उचलावा, तसेच या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





