19 पैकी 14 जागा जिंकत ’सहकार’ पॅनलची बाजी
लातूर जिल्हा बँकेवर पुन्हा देशमुखांचीच सत्ता

निलंग्यात पुतण्याने केला काकूचा पराभव
लातूर /16 नोव्हेंबर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमधील जिल्हा बँकेची निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज झालेल्या मतमोजणीत 15 पैकी सहकार पॅनलचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. तर परिवर्तन पॅनलला 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे जिल्हा बँकेवरील सहकार पॅनलचे वर्चस्व कायम राहिले आहे.
19 पैकी 4 जागा बिनविरोध-लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या 19 पैकी 15 जागांवर रविवार मतदान झाले होते. लातूर जिल्हा बँकेच्या एकूण 19 जागांपैकी 4 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 15 जागांसाठी रविवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत तब्बल 99.40 टक्के इतकं विक्रमी मतदान झालं होतं. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दोन्ही पॅनलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र या अटीतटीच्या सामन्यात काँग्रेसनं जोरदार विजय मिळवला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून जिल्हा बँकेवर सुरेश देशमुख यांच्या सहकार पॅनलची सत्ता आली आहे.
काकी – पुतण्या लढत-भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू आणि परिवर्तन पॅनलचे उमेदवार अरविंद पाटील निलंगेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या काकी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव करत पहिल्यांदाच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रवेश केला आहे.





