सरकारी वास्तूच्या गैरवापराविरोधात भाजपचा जिल्हा कचेरीवर एल्गार
मोर्शी नगरपरिषदेच्या छतावरील मटण पार्टी प्रकरण

आ. उमेश यावलकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
नियमबाह्य वापर करणार्यांविरोधात कठोर कारवाईचा मागणी
अमरावती/16 नोव्हेंबर– मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांनी मांसाहारी (मटण पार्टी) मेजवानी झोडल्याचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. सरकारी वास्तूचे पावित्र्य भंग करणार्या या प्रकारामुळे मोर्शीत संतापाचा भडका उडाला असून सत्ताधारी आणि विरोधक थेट आमनेसामने ठाकले आहेत. या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असा आक्रमक पवित्रा भाजपचे आ. उमेश यावलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देऊन घेतला आहे.
मोर्शी नगरपरिषद कार्यालयाच्या छतावर नुकतीच मटण पार्टी (मांसाहारी) मेजवानी रंगल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. जनतेच्या कामासाठी असलेल्या शासकीय इमारतीचा असा मनमानी आणि नियमबाह्य वापर करणार्यांविरोधात भारतीय जनता पक्षाने एल्गार पुकारला आहे. या प्रकाराविरोधात आक्रमक होत भाजपचे आ. उमेश यावलकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व पदाधिकार्यांनी थेट अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर केले. सरकारी इमारतीचा असा गैरवापर करणे हे अत्यंत नियमबाह्य आणि निषेधार्ह कृत्य असल्याचा हल्लाबोल भाजपने निवेदनाद्वारे केला आहे. नगरपरिषदेच्या छतावर रंगलेल्या या मेजवानीची कसून चौकशी करावी आणि संबंधितांवर तातडीने निलंबनासह कठोर कारवाईचा बडगा उगारावा अशी आग्रही मागणी भाजपच्या पदाधिकार्यांनी लावून धरली आहे. प्रशासनाने या प्रकरणात कोणतीही चालढकल करू नये असा इशाराही या वेळी देण्यात आला. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने, काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक यांच्यासह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी थेट मागणी भाजपने केली आहे. या घडामोडींमुळे मोर्शी नगरपरिषदेतील सत्ताधारी गट चांगलाच कोंडीत सापडला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
मित्रपक्षांमधील राजकीय संघर्ष भडकण्याची चिन्हे
या मेजवानी प्रकरणामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील राजकीय वाद आगामी काळात अधिकच भडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मोर्शी नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधक या निमित्ताने पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या वाढत्या राजकीय संघर्षाचे तीव्र पडसाद आगामी काळात शहराच्या राजकारणात उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
जिल्हाधिकारी आशिष येरेकर या आक्रमक निवेदनावर नेमकी काय भूमिका घेतात आणि प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देतात का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या गंभीर आरोपांवर अद्याप संबंधित नगराध्यक्ष, नगरसेवक किंवा नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. संबंधितांच्या या मौनामुळे मोर्शीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना मोठे उधाण आले आहे.





