घरगुती सिलिंडरमधून गॅस चोरीचा संशय

2 ते 3 किलो गॅस काढल्याचा नागरिकांचा आरोप

गॅस वितरकांच्या भूमिकेवरही उपस्थित प्रश्न

अमरावती/13 नोव्हेंबर – शहरात घरगुती गॅस सिलिंडरमधून मोठ्या प्रमाणात गॅस चोरी होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. एका सिलिंडरमधून 100 ग्रॅमपासून ते 2 ते 3 किलोपर्यंत गॅस काढला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गॅस वितरण करणारे काही कर्मचारीही या प्रकारात सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
यापूर्वी पोलिसांनी याच परिसरात छापा टाकून काही जणांना रंगेहात पकडले होते. त्यामुळे पुन्हा धडक कारवाई करावी आणि ग्राहकांनी सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी वजन तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील गाडगे महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर हा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भरलेल्या सिलिंडरमधून गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा धंदा सुरू असल्याचा आरोप आहे. सकाळी गोदामातून सिलिंडर घेऊन निघाल्यानंतर ठिकठिकाणी गॅस काढला जात असल्याची तक्रार आहे. हातगाडी, स्वयंचलित रिक्षा आणि सायकल रिक्षांमधून सिलिंडरची ने-आण करणारे कर्मचारी या मार्गावर दिसतात. चोरीचा गॅस अधिक दराने उपाहारगृहांना दिला जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले. या प्रकारात संबंधित गॅस वितरकांचे कर्मचारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, एका सिलिंडरमधून दुसर्‍या सिलिंडरमध्ये गॅस भरताना निष्काळजीपणा झाल्यास आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते. यापूर्वी पोलिसांनी याच भागात कारवाई करून गॅस चोरी करणार्‍यांना पकडले होते. आता पुन्हा छापे टाकून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पोलिस, वजनमाप विभाग आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. गृहिणींनी घरपोच आलेल्या सिलिंडरचे वजन तपासूनच ते स्वीकारावे. वजन कमी असल्यास संबंधित वितरकाकडे तक्रार करावी.

गॅस ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे

घरपोच आलेला सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी त्याचे वजन तपासावे. वजन कमी आढळल्यास सिलिंडर स्वीकारू नये आणि संबंधित गॅस वितरकाकडे तक्रार करावी. गॅस चोरीचा प्रकार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी. वजनमाप विभागानेही तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

Back to top button