परिणय फुकेंच्या मुलाच्या कारने चिरडले, एकाचा मृत्यू
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

मुंबई/12 नोव्हेंबर : भाजपा आमदार परिणय फुके यांच्या मुलाचा कार अपघात झाला असून त्यात एका तरूणाचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सपकाळ यांनी ट्विट करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील नागपूरजवळच्या पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त कार भाजपा आमदार परिणय फुके यांच्या मालकीची आणि अपघातावेळी त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे असं त्यांनी म्हटलं. तसेच एका तरुणाचा जीव गेला आहे, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा किंवा राजकीय दबावातून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आमदाराचा मुलगा म्हणून कायद्यापासून संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दरम्यान, या प्रकरणात काँग्रेसकडून आरोप होत असले तरी हा अपघात 4 नोव्हेंबर रोजी घडलेला आहे. याची नोंद मध्य प्रदेशातील कुरही पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने तिथे करण्यात आली आहे. नागपूरातील काही तरूण हॉटेलमधून माघारी परतताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. अपघातग्रस्त वाहन अनियंत्रित झाल्याने ही घटना घडली असं पोलिसांनी घटनेच्या वेळी सांगितले होते. मात्र यात कुठल्याही नेत्याचा मुलगा आहे किंवा नाही ही माहिती पोलिसांकडून देण्यात आली नव्हती. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.





