जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते स्वप्नील केवदेंचा गौरव
गणेशोत्सव व दुर्गोत्सव विसर्जनादरम्यान अनेक भाविकांचे प्राण वाचविल्याबद्दल कौतुक

कुर्हा /11नोव्हेंबर : संकटाच्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसर्यांचे प्राण वाचविण्यासाठी धावून जाणे हीच खरी माणुसकी आणि समाजसेवेची ओळख आहे. अशाच धाडसी आणि प्रसंगावधान राखणार्या कौंडण्यपूर येथील नाव चालक स्वप्नील केवदे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कुर्हा पोलीस स्टेशनच्या वतीने तक्रार निवारण दिन व ’ऑपरेशन कवच’ अंतर्गत आयोजित शांतता समितीच्या बैठकीत हा गौरव सोहळा पार पडला. गणेश विसर्जन आणि दुर्गा विसर्जनाच्या काळात कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील वर्धा नदीच्या घाटावर मोठ्या संख्येने भाविक विसर्जनासाठी येत असतात. यावेळी नदीपात्रातील परिस्थिती धोकादायक बनण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी नाव चालक स्वप्नील केवदे यांनी प्रसंगावधान राखत अनेक भाविकांना मदतीचा हात देऊन त्यांचे प्राण वाचविले. त्यांच्या या धाडसी कार्यामुळे अनेक कुटुंबांवर ओढवणारे संकट टळले.
स्वप्नील केवदे यांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि सामाजिक बांधिलकी ही समाजातील इतर युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे कौतुक यावेळी करण्यात आले. समाजात शांतता व सुरक्षितता राखण्याबरोबरच संकटकाळी नागरिकांच्या मदतीला धावून जाणार्या अशा व्यक्तींचा सन्मान होणे गरजेचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, पत्रकार अशोक पवार, चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश तातोड, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे दीपक लांडे, कुर्हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवहरी सरोदे, प्रविण बाखडे, अनिल निंघोट, सागर निमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वप्नील केवदे यांच्या या निस्वार्थी आणि धाडसी कार्याचा पोलीस प्रशासनाकडून झालेला गौरव कौंडण्यपूरसह परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. खर्या अर्थाने माणुसकी जपणार्या या युवकाच्या कार्यामुळे ’माणुसकी अजूनही जिवंत आहे’ याची प्रचिती आली आहे.





