मध्यप्रदेशातून येणारा लाखो रुपयांचा गुटखा जप्त
55 लाख रुपयांच्या मुद्देमालासह वाहन ताब्यात

मोर्शी पोलिसांची नाकाबंदीत धडक कारवाई
मोर्शी /11 नोव्हेंबर– मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात छुप्या मार्गाने पाठवला जाणारा 35 लाख 9 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा मोर्शी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पाठलाग करून पकडला. या धडक कारवाईत 20 लाख रुपयांचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून एकूण 55 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमरावती शहरातील चार जणांविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आंतरराज्यीय गुटखा तस्करीच्या पुरवठा साखळीचा पर्दाफाश झाला आहे. अमरावती ग्रामीण भागात मध्यप्रदेशातून मोठ्या वाहनांतून चोरट्या मार्गाने गुटखा आणला जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. हा साठा अमरावती जिल्ह्यातील खेडोपाड्यात आणि शहरात चढ्या भावाने विक्रीसाठी नेला जात होता. या माहितीच्या आधारे मोर्शी पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी तातडीने सापळा रचून सीमावर्ती मार्गावर कडक नाकाबंदी सुरू केली. संशयित अशोक लेलँड वाहन वेगाने येताना दिसताच पंचांच्या उपस्थितीत अडवून तपासणी करण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता त्यात पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा आढळून आला.(पोलिसांनी घटनास्थळावरूनवाहनचालक शाहरुख खान सर्फराज खान याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार हा माल पांढूर्णा येथील गोदामातून भरण्यात आला होता. तो अमरावतीत पोहोचवून स्थानिक गोदामात साठवला जाणार होता. यावरून पांढूर्णा येथील गुटखा पुरवठादार जावेद सेठ ऊर्फ जावेद हारून सुपारीवाला, अमरावती येथील चांद खान ऊर्फ चांद भाई आणि रेहान खान ऊर्फ रेहान भाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घनश्याम दंडे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून पोलीस पथक पुढील तपास करत आहे.
तस्करांचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस आणणार-जप्त केलेला मुद्देमाल मध्यप्रदेशातील पांढूर्णा येथून अमरावतीत आणला जात होता. या अवैध धंद्यामागील मुख्य सूत्रधार, माल साठवणारे गोदाम मालक, वाहतूकदार आणि स्थानिक विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणार आहे. नागरिकांनी अवैध साठवणूक आणि विक्रीची गुप्त माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले.





