शेतकर्‍यांना 12 तास वीजपुरवठ्याची घोषणा कागदावरच

निरसाना फीडरच्या शेतकर्‍यांचे महावितरणला निवेदन

सहा तास दिवसा वीज देण्याची मागणी

अंजनगाव बारी/11नोव्हेंबर : शेतकर्‍यांना 12 तास वीजपुरवठा देण्याच्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात कृषी वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी कायम असल्याचे चित्र निरसाना परिसरात दिसून येत आहे. महावितरणने 20 ऑक्टोबर 2026 पासून लागू केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार सातरगाव -ॠ व पार्डी -ॠ फीडरला सकाळी व दिवसा वीजपुरवठा दिला जात आहे. मात्र, 11 केव्ही निरसाना -ॠ फीडरवरील वीजपुरवठा रात्री 12 ते सकाळी 10 वाजेपर्यंत ठेवण्यात आल्याने निरसाना परिसरातील शेतकर्‍यांना रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
रात्रीच्या वेळी साप, विषारी कीटक तसेच रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांचा धोका असल्याने शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळा व पावसाळ्यात रात्री शेतात काम करणे अधिक त्रासदायक ठरत आहे. इतर कृषी फीडरना दिवसा वीजपुरवठा मिळत असताना निरसाना फीडरच्या शेतकर्‍यांनाच रात्रीच्या वेळापत्रकाचा सामना का करावा लागत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे विचारणा केली असता, कृषी वीजवाहिनीवरील अतिरिक्त भारामुळे ताण निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार वेळापत्रकात बदल करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकर्‍यांनी महावितरण कार्यालय गाठून अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी आमदार रवी राणा यांचाही फोन आला. त्यानंतर अधिकार्‍यांनी दुसर्‍या दिवसापासून सकाळची वीज सुरू करण्याचे आणि लवकरच पूर्ण वेळ दिवसा वीजपुरवठा देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शेतकरी प्रशांत दारोदार यांनी दिली.

सातही दिवस दिवसा वीज मिळावी
महावितरण कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते बंडू डकरे यांच्यासोबत जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली. आ. रवी राणा यांचाही फोन आला. अधिकार्‍यांनी सकाळची वीज देण्याचे व लवकरच पूर्ण वेळ दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले.

Back to top button