ऑटोचालकाच्या प्रामाणिकपणाने जिंकली मने
महिलेचे 2 लाखांचे दागिने परत केले

रोख रक्कम मोबाईलसह मौल्यवान वस्तूंचा समावेश
चांदूरबाजार /11 नोव्हेंबर – सध्याच्या काळात हरवलेल्या वस्तू परत मिळणे कठीण झाले असताना चांदूरबाजार येथील ताजनगर परिसरातील ऑटोचालक शेख अफजल शेख उस्मान यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. प्रवासादरम्यान ऑटोमध्ये विसरलेली एका महिलेची पर्स त्यांच्या हाती लागली.
या पर्समध्ये 5 हजार रुपये रोख, 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि जवळपास 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. एवढ्या मौल्यवान वस्तू जवळ असूनही कोणताही मोह न ठेवता त्यांनी पर्स तिच्या मालकिणीपर्यंत पोहोचविली. त्यांच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळीपुरा येथील कविता यावत्तकर या महिला स्थानिक बसस्थानकातून शेख अफजल यांच्या ऑटोने घरी गेल्या होत्या. महिलेला घरी सोडल्यानंतर अफजल पुन्हा बसस्थानकाकडे परतले. त्यावेळी ऑटोच्या मागील आसनावर त्यांना एक पर्स पडलेली दिसली. त्यांनी पर्स उघडून पाहिली असता त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने असल्याचे लक्षात आले. पर्समधील वस्तूंची किंमत मोठी असल्याने त्यांनी ती सुरक्षितपणे संबंधित महिलेला परत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पर्सच्या मालकिणीचा शोध घेत त्यांनी कविता यावत्तकर यांच्या घरी जाऊन सर्व साहित्य त्यांच्या स्वाधीन केले. आपले हरवलेले पैसे, मोबाईल आणि सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळाल्याने कविता यावत्तकर यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांनी शेख अफजल शेख उस्मान यांचे आभार मानत त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. आजच्या काळात अशा घटना समाजाला माणुसकीची जाणीव करून देतात. शेख अफजल यांच्या या कृतीमुळे चांदूरबाजार परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





