रामपुरी कॅम्पच्या कामास कुणाची परवानगी

माजी मंत्री डॉ. सुनील देशमुखांचा थेट पालिका प्रशासनावर वार

दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणार्‍यांची चौकशी करा

अमरावती/11 नोव्हेंबर – शहरातील गजबजलेल्या रामपुरी कॅम्प प्रवेशद्वाराच्या मोठ्या कमानीचे सुरू असलेले बांधकाम अचानक खाली आल्याने 5 मजूर ढिगार्‍याखाली दबून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या धोकादायक बांधकामाला महापालिकेची परवानगी नसल्याचा थेट पर्दाफाश माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. लोकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ उघडकीस आणत त्यांनी पालिका कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची ठाम भूमिका घेतली आहे.
शहरातील सर्वाधिक रहदारी असणार्‍या रामपुरी कॅम्प भागात प्रवेशद्वारासाठी भव्य कमान उभारण्याचे काम वेगाने सुरू होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मजूर वरच्या भागावर काम करत असताना अचानक भलीमोठी कमान पत्त्यासारखी खाली कोसळली. क्षणात झालेल्या या मोठ्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या भयानक दुर्घटनेनंतर माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी तात्काळ पुढाकार घेत घटनास्थळाचा आढावा घेतला आणि संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सार्वजनिकबांधकाम विभागाकडून अशा कोणत्याही बांधकामासाठी कार्यादेश दिला नसल्याचे धक्कादायक वास्तव डॉ. सुनील देशमुख यांनी समोर आणले. इतकेच नाही तर महापालिका प्रशासनानेही या कामाची कोणतीही अधिकृत जबाबदारी घेतली नसल्याचे उघड झाले आहे.
प्रशासनाचा हा बेजबाबदार कारभार पाहून डॉ. सुनील देशमुख यांचा संताप अनावर झाला. अमरावती महापालिका आहे की भटारखाना असा थेट सवाल करत त्यांनी पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले. कोणत्याही विभागाची रीतसर मंजुरी नसताना एवढ्या मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर कमान उभारण्याचे धाडस कोणाच्या पाठबळावर सुरू होते असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या सिमेंट आणि लोखंडाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा प्राथमिक संशय असून कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेची कोणतीही साधी सोय करण्यात आलेली नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या बेकायदेशीर कामात गोरगरीब मजुरांचा नाहक बळी जाण्याची वेळ आली असून नागरिकांच्या जिवापेक्षा कोणत्याही कंत्राटदाराची किंवा अधिकार्‍याची सोय मोठी असू शकत नाही असा स्पष्ट इशारा डॉ. सुनील देशमुख यांनी दिला. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करावा अशी मागणी करत त्यांनी निकृष्ट काम करणार्‍या कंत्राटदारासह त्याला पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांची नावे तात्काळ जाहीर करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी असे स्पष्ट केले.

कंत्राटदार पंकज शर्मा, आदित्य गुप्तांवर गुन्हा दाखल

अमरावती – रामपुरी कॅम्प मुख्य रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास स्वागत कमानीच्या बांधकामाचा मोठा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत प्रत्यक्ष काम करत असलेले 4 मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संपूर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी दोन्ही कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून परिसरात मोठी खळबळ उडाली.
शिवाजी फलोत्पादन वसतिगृहासमोर सुरू असलेल्या कमानीच्या तुळईचे बांधकाम अचानक ढासळल्याने गोंधळ उडाला. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक मनीष चेतन बजाज यांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या अधिकृत तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी संबंधित कामाचे कंत्राटदार पंकज शर्मा, आदित्य गुप्ता यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवला. ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करत आहे.

परवानगीशिवाय काम कसे सुरू झाले

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाचा कुठलाही अधिकृत कार्यादेश नसताना एवढे मोठे बांधकाम सुरू कसे होते. या बांधकामाचा आराखडा कोणत्या अधिकार्‍याने तपासला आणि त्याला तांत्रिक मान्यता दिली का. मजुरांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी जागेवर कुठलीही सुरक्षा साधने का नव्हती असे अनेक गंभीर प्रश्न डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

Back to top button