डॉ. भोजने दाम्पत्य गजाआड
साडेतीन लाखात नवजात बालक विक्री प्रकरणात मोठी कारवाई

24 दिवसांपासून दोघेही होते फरार
अकोली परिसरातून पोलिसांनी घेतले ताब्यात
रुग्णालय सील, नोंदणी रद्द कडक कारवाई सुरू
अमरावती/11 नोव्हेंबर – साडेसतरा वर्षीय मुलीची प्रसूती लपवून तिचे नवजात बाळ साडेतीन लाख रुपयांत विकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 24 दिवसांपासून फरार असलेले डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने आणि पती प्रफुल्ल वसंतराव भोजने यांना फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी रात्री साईनगर अकोली परिसरातून अटक केली. या प्रकरणात 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून दोघे पसार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचा 17 वर्षीय प्रियकर, डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (1), 143 (3), 143 (4), 351 (2), 3 (5) सह कलम 4, 6, 21 पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सहआरोपी डॉ. मयूर उत्तम धांडगे याला यापूर्वीच अटक झाली होती. अल्पवयीन प्रियकराला ताब्यात घेऊन बालगृहात पाठवलेहोते. नवजात बाळ सध्या सुरक्षित असून आईजवळ आहे. बुटी प्लॉट येथील रुग्णालय, सोनोग्राफी केंद्र आणि गर्भपात केंद्र महापालिकेने सील केले आहे. रुग्णालयाची नोंदणी आणि डॉ. वैशाली भोजने यांची गर्भपात कायद्याखालील नोंदणी निलंबित केली आहे.
पीडितेचे तिच्याच वयाच्या एका 17 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून ती गर्भवती राहिली. घरच्यांना याची कुणकुण लागली. त्यांनी तिला राजापेठ बुटी प्लॉट येथील डॉ. भोजने मॅटर्निटी अँड नर्सिंग होममध्ये डॉ. वैशाली भोजने यांच्याकडे नेले. तपासणीत 5 महिन्यांचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले. प्रसूतीपर्यंतचे सर्व उपचार तिथेच झाले. अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेची माहिती मिळताच डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना कळवणे बंधनकारक होते. मात्र तसे केले गेले नाही, असा पोलिसांचा आरोप आहे. 15 ऑक्टोबर रोजी त्या मुलीने बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर महिला डॉक्टर आणि तिच्या पतीने पीडितेच्या वडिलांना फोन करून दवाखान्यात बोलावले. नवजात बाळ साडेतीन लाख रुपयांत विकण्याचा कट रचल्याचा आरोप तक्रारीत आहे. सुरुवातीला दिशाभूल करण्यासाठी हे बाळ अनाथालयात किंवा अधिकृत दत्तक संस्थेला देऊ, काळजी करू नका, असे सांगण्यात आले. आपल्याच बाळाचा काळाबाजार होत असल्याचा संशय आल्याने पीडिता आणि तिच्या आईवडिलांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी ते बाळ जबरदस्तीने ताब्यात घेऊन दवाखान्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बाळाच्या ताब्यावरून वाद झाला. त्या वेळी डॉक्टर दाम्पत्याने धमकी दिल्याचा आरोपही आहे.
या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच डॉ. भोजने आणि तिचे पती फरार झाले. दवाखान्याला कुलूप लावून ते पळून गेले. प्रफुल्ल भोजने हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पीडिता सर्वप्रथम डॉ. मयूर उत्तम धांडगे, रा. प्रशांत नगर यांच्याकडे गेली होती. त्यांनी पोलिसांना न कळवता तिला थेट भोजने यांच्याकडे पाठवले. म्हणून त्याला 19 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 12 मिनिटांनी अटक करण्यात आली. 17 वर्षीय विधीसंघर्षित मुलाला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. 21 ऑक्टोबर रोजी महापालिका आरोग्य विभागाने कारवाई केली. डॉ. विशाल काळे, ठाणेदार रवींद्र राजुलवार आणि सहायक पोलीस निरीक्षक निरंजना उमाळे यांच्या पथकाने बुटी प्लॉट मधील रुग्णालय, सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्र सील केले. कुलूप तोडून आत प्रवेश करावा लागला. रुग्णालयाचे नर्सिंग होम नोंदणी आणि डॉ. वैशाली भोजने यांचे गर्भपात कायदा 1971 चे नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आले. 2017 मध्येही याच रुग्णालयावर गर्भपात संदर्भात कारवाई झाली होती. नवजात बाळ सध्या सुरक्षित असून रुक्मीनगर येथील बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले असून आईजवळच आहे.
भोजने दाम्पत्य साईनगर अकोली परिसरात लपून बसल्याची पक्की बातमी गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र राजुलवार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, गुन्हे शाखा पथक आणि महिला पोलीस अंमलदारांनी साईनगर परिसरात सापळा रचला. संशयितांची कसून शहानिशा केल्यानंतर ते भोजने दाम्पत्यच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेऊन फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आणले व रीतसर अटक केली. ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजुलवार, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार शेखुवाले, पोलीस नाईक बोरकर, सागर, पोलीस शिपाई जावेद, पोलीस शिपाई प्रशांत, पोलीस शिपाई जयेश, पोलीस शिपाई अखिल, पोलीस शिपाई पराळे, महिला पोलीस नाईक सपना, शासकीय वाहन चालक होमगार्ड अमन यांनी कामगिरी बजावली. पोलीस आता तपास करत आहेत की हा एकटा प्रकार आहे की यामागे मोठे रॅकेट आहे. यापूर्वी किती बाळांची अशी विक्री झाली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने, वय 49 आणि प्रफुल्ल वसंतराव भोजने, वय 56, दोघे रा. बुटी प्लॉट, राजापेठ, मूळ रा. हिवरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कायद्याच्या कचाट्यात अडकले आरोपी जोडपे
या गुन्ह्यात बलात्कार, पोक्सो, गुन्हेगारी धमकी आणि मानवी तस्करी अशी गंभीर कलमे लावली आहेत. अल्पवयीन पीडितेची माहिती पोलिसांना न देणे हाही वेगळा गुन्हा मानला जातो. डॉक्टरांनी माहिती लपवल्याने तपास अधिक गुंतला. पोलिसांनी सर्व कागदपत्रे, नोंदवह्या आणि उपचाराचे तपशील ताब्यात घेतले आहेत. आता न्यायालयीन प्रक्रियेत या कागदपत्रांचा वापर होणार आहे.
रुग्णालयावर पूर्वीही झाली होती कडक कारवाई
बुटी प्लॉट येथील हे रुग्णालय राजापेठ उड्डाणपुलाजवळ गुरुद्वाराच्या बाजूला आहे. 2017 मध्येही येथे गर्भपात संदर्भात कारवाई झाली होती. तरीही पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांत संताप आहे. महापालिकेने परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरातील लोक या कारवाईकडे लक्ष ठेवून आहेत.





