निक्कूच्या हत्येप्रकरणी चौघांना 13 पर्यंत कोठडी

जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हत्याकांड

मुख्य आरोपी राजू काळेला अटक

अमरावती/10 नोव्हेंबर – दिवाळीच्या रात्री महेंद्र कॉलनी परिसरात निक्कू ऊर्फ चैतन्य कचरे याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी राजू काळे याच्यासह चौघांना अटक केली. जुन्या वादाचा आणि 6 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. राजू काळे, विशाल यादव, अश्विन पहाडण आणि भूषण टाळे या चौघांना न्यायालयाने 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिवाळीच्या रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. निक्कू ऊर्फ चैतन्य कचरे हा घरात झोपलेला असताना आरोपी राजू काळे याने त्याला दूरध्वनी करून बाहेर बोलावले. त्यानंतर साथीदारांसह त्याच्यावर धारदार चाकूने गळ्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात निक्कू गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी निक्कूला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचे वडील राजेंद्र कचरे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सुरुवातीला गुल्या, विशाल यादव आणि भूषण टाळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी राजू काळे यालाही पोलिसांनी अटक केली. चौघांना न्यायालयात हजर केले असता 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Back to top button