पहिल्यांदाच मेळघाटात दुर्मिळ ठिपकेदार घुबडाची नोंद
मध्य भारतातील दुसरी नोंद ठरली विशेष

सेमाडोह परिसरात स्थानिक मार्गदर्शकांना प्रथम दर्शन
अमरावती/10 नोव्हेंबर – जैवविविधतेने समृद्ध असलेल्या मेळघाटच्या जंगलात दुर्मिळ पक्ष्याची नोंद झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव क्षेत्रातील सेमाडोह परिसरात ठिपकेदार गरुडघुबड प्रथमच आढळून आले. मेळघाटातील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद असून, मध्य भारतातील दुसरी नोंद ठरली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात या पक्ष्याचे दर्शन झाले होते. विशेष म्हणजे, सेमाडोह परिसरात कार्यरत स्थानिक निसर्ग मार्गदर्शकांनी या दुर्मिळ पक्ष्याची नोंद केली असून, त्यामुळे मेळघाटच्या पक्षीवैविध्यात आणखी एका महत्त्वाच्या पक्ष्याची भर पडली आहे.
मेळघाटच्या जंगलात विविध प्रकारचे वन्यजीव आणि पक्षी आढळतात. मात्र, ठिपकेदार गरुडघुबडाची नोंद होणे ही वन्यजीव अभ्यासकांसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे. यापूर्वी मध्य भारतात या पक्ष्याची पहिली नोंद पेंच व्याघ्र प्रकल्पात झाली होती. त्यानंतर आता मेळघाटातील सेमाडोह परिसरात त्याचे अस्तित्व समोर आले आहे. या पक्ष्याची नोंद स्थानिक निसर्ग मार्गदर्शक भोला बाबू मावसकर, अविनाश एच. मसाराम, अशोक एस. मावसकर आणि अक्षय भोला मावसकर यांनी केली. जंगलातील पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण आणि निसर्गाविषयी असलेल्या आवडीमुळे ही महत्त्वाची नोंद शक्य झाली. या पक्ष्याचे पर्यावरणातील महत्त्व, जैवविविधतेतील स्थान आणि अन्नसाखळीतील भूमिका याबाबत अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक सौरभ पुरुषोत्तम जवंजाळ यांनी माहिती दिली. या नोंदीमुळे मेळघाटचे जंगल पक्षी निरीक्षक, संशोधक आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दुर्मिळ पक्ष्याच्या नोंदीने मेळघाटचे महत्त्व वाढले
मेळघाटच्या जंगलात अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे वास्तव्य आहे. ठिपकेदार गरुडघुबडाची नोंद ही केवळ पक्षी निरीक्षणापुरती मर्यादित नसून, या जंगलातील समृद्ध जैवविविधतेचा महत्त्वाचा पुरावा आहे. स्थानिक निसर्ग मार्गदर्शकांच्या निरीक्षणामुळे वन्यजीवांच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली असून, अशा नोंदी भविष्यातील संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहेत.





