थंडी गायब बाजारपेठेत मंदीचे सावट
स्वेटर जॅकेटच्या विक्रीला ग्राहकांची प्रतीक्षा

* तिबेटी व्यापार्यांचे भांडवल अडकले बाजारात
अमरावती/10 नोव्हेंबर- नोव्हेंबर महिना सुरू होऊनही अमरावतीत थंडीचा जोर वाढलेला नसल्याने गरम कपड्यांच्या बाजारपेठेत मंदीचे चित्र आहे. स्वेटर, जॅकेट, टोपी, शाली आणि ब्लँकेटची दुकाने सजली असली, तरी ग्राहकांची गर्दी कमी आहे. तिबेटी व्यापार्यांसह स्थानिक विक्रेत्यांनी मोठी गुंतवणूक करून माल भरला आहे. मात्र, विक्री रखडल्याने भांडवल अडकले असून, उत्पादन आणि वाहतूक खर्च वाढल्याने कपड्यांच्या किमतीतही 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिवाळा सुरू होताच दरवर्षी गरम कपड्यांच्या खरेदीला वेग येतो. मात्र, यंदा नोव्हेंबरमध्येही अपेक्षित थंडी नसल्याने बाजारपेठेत शांतता आहे. जयस्तंभ चौक, गाडगेनगर आणि राजकमल चौक परिसरात गरम कपड्यांची दुकाने सजली आहेत. स्थानिक विक्रेत्यांसह तिबेटी व्यापारीही व्यवसायासाठी दाखल झाले आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी विविध प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या कपड्यांमध्ये डोरेमॉन, मिकी माऊस आणि स्पायडरमॅनच्या चित्रांची विशेष आकर्षण आहे. मात्र, ग्राहकांची कमी गर्दी आणि वाढलेल्या किमती यामुळे विक्रीला अपेक्षित चालना मिळत नाही. थंडीचा जोर वाढल्यानंतर खरेदीला वेग येईल, अशी आशा व्यापारी व्यक्त करीत आहेत.
थंडीच्या प्रतीक्षेत व्यापार्यांचे भांडवल अडकले-हिवाळ्याच्या हंगामासाठी व्यापार्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात स्वेटर, जॅकेट, टोपी, शाली आणि ब्लँकेटचा साठा केला आहे. अनेकांनी कर्ज काढून व्यवसायात पैसे गुंतवले आहेत. मात्र, थंडी नसल्याने माल दुकानातच पडून आहे. त्यातच वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढल्याने किमतीही वाढल्या आहेत. ग्राहकांची कमी गर्दी आणि वाढता खर्च यामुळे व्यापार्यांची चिंता वाढली असून, आता त्यांचे लक्ष कडाक्याच्या थंडीकडे लागले आहे.





