शक्तिमहाराज यांच्यातर्फे भाविकांना बरकतचे वाटप
काली माता मंदिरात दिवाळीच्या रात्री भक्तांची गर्दी

अमरावती /9 नोव्हेंबर- दिवाळीच्या रात्री काली माता मंदिरात शक्ती महाराजांकडून भाविकांना बरकत म्हणून रुपये आणि नाणी वाटण्याची अनेक वर्षांची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. रविवारी रात्री हजारो भाविकांनी या प्रसादरूपी बरकतीसाठी मंदिरात गर्दी केली होती. महिला भाविकांची संख्या मोठी असल्याने दर्शन आणि बरकत घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी महिला पोलिसांना विशेष मेहनत घ्यावी लागली. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता राजापेठ पोलिस ठाण्याकडूनही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अमरावतीच्या काली माता मंदिरातील ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. दिवाळीच्या रात्री शक्ती महाराजांकडून विधिवत लक्ष्मीपूजन आणि काली मातेची पूजा केली जाते. त्यानंतर ते रुपये आणि नाण्यांनी भरलेली भांडी घेऊन बसतात. मंदिरात येणार्या प्रत्येक भाविकाला काली मातेचा जयघोष करीत बरकत म्हणून रुपये आणि नाणी दिली जातात. ही बरकत मिळवण्यासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदाही रात्रीपासूनच मंदिर परिसरात भाविकांची ये-जा सुरू होती. विशेष म्हणजे महिला भाविकांची संख्या अधिक असल्याने गर्दीचा ताण वाढला होता. महिला पोलिस कर्मचार्यांनी रांगा व्यवस्थित लावून भाविकांना एकामागून एक पुढे जाण्यास मदत केली. त्यानंतर प्रत्येक भाविकाने शक्ती महाराजांच्या हस्ते बरकत स्वीकारली. या वेळी अमरावतीतील अनेक प्रसिद्ध उद्योजक, व्यापारी, नेते, राजकारणी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनीही उपस्थिती लावली. काली मातेच्या प्रसादरूपात मिळणारे रुपये आणि नाणी घरातील तिजोरीत ठेवल्यास आर्थिक प्रगतीसह कामांमध्ये यश मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अमरावतीतील या परंपरेची चर्चा शहरासह परिसरातही होत आहे.





