वैभव चव्हाणच्या मृत्यूचे गूढ वाढले
घातपाताचा नातेवाइकांचा आरोप

बीड/6 नोव्हेंबर-बीड जिल्ह्यात पोलीस भरतीतील बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचे प्रकरण समोर आणणार्या 24 वर्षीय वैभव चव्हाण या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नवगण राजुरी येथील रहिवासी असलेल्या वैभवचा मृतदेह गुरुवारी इमामपूर शिवारात आढळून आला. त्याच्या शरीरावर आणि पायांवर मारहाणीच्या खुणा असल्याचा दावा त्याचा भाऊ गणेश चव्हाण आणि नातेवाइकांनी केला आहे.
वैभवचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैभव हा कराटे खेळातील उत्कृष्ट खेळाडू होता. त्याच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत क्रीडा प्रमाणपत्रे होती. 2024-25 मध्ये झालेल्या धाराशिव पोलीस भरतीसाठी त्याने खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. प्रतीक्षा यादीत असताना त्याच्या पुढील उमेदवाराने बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा संशय वैभवला आला. त्यानंतर त्याने पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ’कुराश असोसिएशन’च्या अध्यक्ष, सचिवांसह अनेक जिल्हाध्यक्षांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुण्यात पोलीस भरतीत निवड झालेल्या 19 जणांपैकी नऊ जणांना, जे त्यावेळी सेवेत होते, अटक होऊन तुरुंगात जावे लागले होते. या प्रकरणानंतर बोगस प्रमाणपत्र तयार करणार्यांकडून स्वतःच्या आणि मित्राच्या जीवाला धोका असल्याचे वैभवने एका ऑडिओ संदेशातून सांगितले होते. हा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.





