अनुदान आलेले 5 हजार बँकेने परस्पर कर्ज खात्यात वळवले

मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत आहे का?

दिवाळीचा आनंद हिरावल्याची शेतकर्‍याची खंत

जळगाव /6 नोव्हेंबर: शेतकर्‍यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. तसेच दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये जमा करण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. त्याप्रमाणे बुधवारी (4 नोव्हेंबर 2026) तब्बल 73 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा केले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर दिली होती. पण, जळगावमधील एका शेतकर्‍याने याबाबत दिलेल्या माहितीनंतर शेतकर्‍यांची दिवाळी काळीच होणार असल्याचे स्पष्ट झाले. कारण या शेतकर्‍याच्या खात्यात सरकारकडून अग्रीम म्हणून जमा झालेले 5 हजार रुपये बँकेने लगेचच कर्जाची परतफेड म्हणून वजा केले आहेत.
त्यामुळे शेतकर्‍याच्या खात्यात शून्य रक्कम असून दिवाळीचा आनंद हिरावला गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही, असा थेट सवालही या शेतकर्‍याने केला आहे. राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये अग्रीम म्हणून जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याप्रमाणे 4 नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र, जळगाव जिल्ह्यातील लासगावमधील (ता. पाचोरा) शेतकरी आनंदा सीताराम पैठणकर यांना धक्कादायक अनुभव आला. दुष्काळी अनुदान म्हणून सरकारकडून जाहीर करण्यात आलेले 5 हजार रुपये बँकेने परस्पर कर्ज खात्यात वळवले आहेत. आनंदा सीताराम पैठणकर हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या सामनेर शाखेतील खात्यात दुष्काळी अनुदानाचे 5 हजार रुपये जमा झाले होते. मात्र, हे पैसे काढण्यासाठी ते बँकेत गेले असता, ती रक्कम परस्पर कर्ज खात्यात वर्ग करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
विशेष म्हणजे आनंदा पैठणकर यांनी पासबुकमध्ये एन्ट्री करून घेतल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी त्यांच्या खात्यात 5 रुपये जमा झाल्याचे दिसले आणि त्याच दिवशी त्यांच्या खात्यातून 5 हजार रुपये परस्पर कर्ज खात्यात जमा करण्यात आले. अनुदानाची रक्कम जमा झाल्याचे कळताच आनंदा पैठणकर सुखावले आणि दिवाळीसाठी पैसे काढायला बँकेत गेले. पैसे काढण्याची स्लिप भरून दिल्यानंतर त्यांना खात्यात पैसे नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी 5 हजार रुपये जमा झाल्याचे सांगितल्यावर ती रक्कम कर्ज खात्यात वर्ग झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. याबाबत त्यांनी बँकेच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, पैसे कर्ज खात्यात वर्ग केल्याचे सांगण्यात आले. तसेच, याबाबत अधिकार्‍यांकडे जास्त विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले, अशी तक्रार पैठणकर यांनी केली आहे.

Back to top button