बॉम्बे हायकोर्टासह अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर
धमकीच्या ई-मेलमध्ये मुंबई शेअर बाजाराचाही उल्लेख

मुंबई/6 नोव्हेंबर: मुंबईतून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील बॉम्बे हायकोर्टला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ न्यायालयच नव्हे, तर मुंबई शेअर बाजार (बीएसई), वरळी रेसकोर्स आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, ई-मेलचा स्रोत शोधण्यासह धमकी देणार्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना आणि तुषार कपूर यांना धमक्या मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. आयुष्मान खुराना यांना धमकी दिल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने बंगळुरूमधून एका संशयिताला अटक केली होती. हा आरोपी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात आले होते. तुषार कपूर यांच्याशी संबंधित प्रकरणाचाही पोलिसांनी तपास केला होता. अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना वेगवेगळ्या माध्यमांतून धमक्या मिळाल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा अंडरवर्ल्डचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा सुरू झाली होती.





