धावत्या ट्रेनला भीषण आग, 4 डबे जळून खाक
प्रवाश्यांनी घाबरून खाली उड्या मारल्या

पटियाला/6 नोव्हेंबर : पंजाबमध्ये धावत्या ट्रेनला भीषण आग लागली. पंजाबच्या पटियालाजवळ ही घटना घडली. या आगीत कर्मभूमी एक्स्प्रेसचे 4 डबे जळून खाक झाले. आग लागल्यानंतर ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी प्रचंड घाबरले. जीव मुठीत धरून हे प्रवासी घाबरून सैरावैरा पळू लागले. काही प्रवासांनी धावत्या ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. आग लागताच ट्रेन थांबवण्यात आली त्यानंतर प्रवाशांनी खाली उड्या मारल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पंजाबवरून बिहारला जाणार्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागली. राजपुराच्या दिशेन ही ट्रेन जात होती. त्याचवेळी सराई बंजारा गावाजवळ ट्रेनला आग लागली. चार डब्यांना ही आग लागली. या आगीमध्ये कुणीही जखमी झाले नाही. ट्रेनला आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि रेल्वे कर्मचारी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासामध्ये सर्व संभाव्य बाबींची तपासणी केली जाणार आहे.कर्मभूमी एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचे थरारक व्हिडीओ आणि फोटो0 समोर आले आहेत. आगीच्या ज्वाला आणि परिसरात धुराचे लोट पसरल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे. घटनास्थळी आसपासच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली आहे. आग लागल्याचे कळताच प्रवासी घाबरले आणि त्यांनी ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्या. ही आग ट्रेनच्या पँट्रीमध्ये लागली त्यानंतर ती इतर डब्यांमध्ये पसरली अशी माहिती आहे. फायर अलार्म वाजल्यानंतर सर्वजण सावध झाले आणि ट्रेनमधून बाहेर पडले. या आगीमध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही.





