शिवसेनेकडून 7 लाख 69 हजार दिवाळी शिधांचे वितरण

शेतकर्‍यांसाठी शिवसेनेच्या शाखा बनणार ‘शेतकरी सेवा केंद्र’

मुंबई/5 नोव्हेंबर- प्रत्येक शेतकर्‍याला संकटात मदत करण्याच्या उद्देशातून शिवसेनेकडून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळी निमित्त 7 लाख 69 हजार दिवाळी शिधा किट्स दिले जाणार आहेत. त्यापैकी 5 लाख 38 हजार 500 दिवाळी शिधांच्या किट्सचे वाटप देखील करण्यात आले आहे.
उर्वरित किट्स दोन दिवसांत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतील, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते, माजी खासदार आनंद परांजपे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्‍यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे निर्देश दिले असून येत्या तीन दिवसांत शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचतील. आज बाळासाहेब भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच राज्यातील मराठवाडा, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर भागातील 278 तालुक्यांमधील शेतकरी कुटुबियांना दिवाळी किट्स देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, 1972 नंतर महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन शेतकर्‍यांना भरीव मदतीची मागणी केली होती, त्यानंतर राज्यात केंद्रीय पथकं आली आणि दुष्काळाची पाहणी करुन गेली, असे प्रतिपादन परांजपे यांनी केले.

Back to top button