जिल्हा बँकेत बच्चू कडू यांचा मनमानी कारभार

विरोधी गटातील संचालकांचा आरोप

* कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा दावा

*पत्रकार परिषदेतून केला उहापोह

अमरावती / 1 जुलै: अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत गैरमार्गाचा अवलंब करुन अध्यक्षपद मिळविणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी बँकेत सत्ता प्राप्त करताच खुलेआम मनमानी व नियमबाह्य कारभार सुरु केला आहे. ते आपल्या पदाचा पदोपदी गैरवापर करित आहेत. बँकेतील विरोधकांचा आवाज दाबण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात. असा आरोप बँकेच्या विरोधी गटातील संचालकांनी आज एका पत्रकार परिषदेतून केला. बँकेचे कामकाज योग्य मार्गावर आणण्यासाठी बच्चू कडू यांच्याविरोधात आम्ही संवैधानिक मार्गाने कायदेशिर लढाई लढत आहोत, असेही या संचालकांनी सांगितले. जिल्हा बँकेतील संचालक व बच्चू कडू यांचे विरोधक खासदार बळवंत वानखडे, माजी अमादारविरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, हरीभाउ मोहोड,रवींद्र गायगोले यांनी बच्चू कडू यांच्या कारभारावर ताशेरे ओढत त्यांच्यावर अनेक आरोप केले. गैरमार्गाने बँकेची सत्ता मिळविणारे अध्यक्ष बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी संचालक यांनी जिल्हा बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा खळबळजनक दावाही, यावेळी करण्यात आला. स्थानिक मालटेकडी परिसरातील काँग्रेस भवन येथे ही पत्रकार परिषद पार पडली. बँकेचे विद्यमान अध्यक्ष  बच्चू कडू आणि उपाध्यक्ष प्रविण ढेपे यांच्याकडून खोटे प्रस्ताव सादर करुन दिशाभूल केली जात असून त्याद्वारे गैरप्रकार होत आहे. यासंदर्भात सर्व पुरावे सादर करुन आम्ही ते सिद्ध केले आहे. याबाबत विभागीय उपनिबंधकांकडे अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. असे या संचालकांनी सांगितले. बँकेचे संचालक मंडळ 21 सदस्यीय आहे. यापैकी विशेषज्ञ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कोणत्याही विषयावर मतदानाचा अधिकार नसतो. कोणत्याही प्रस्तावाच्या बाजूने 11 किंवा त्यापेक्षा अधिक संचालकांनी सहमती दर्शविली तरच प्रस्ताव मंजूर करतो येतो. अन्यथा तो प्रस्ताव खारिज होतो. परंतू सत्तापक्षाने बँकेत मनमानी पद्धतीने 13 संचालकांनी ठरविल्यानुसार एक कार्यकारी समिती गठित न करता आपल्या मर्जीतील लोकांना समितीत स्थान दिले आहे. त्याआधारे नियमबाह्य पद्धतीने प्रस्ताव पारित करुन बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोळ करण्यात आला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 24 जुलै 2023 रोजी बच्चू कडू जिल्हा बँकेचे अध्यक्ष बनले तेव्हा त्यांच्यावर नाशिक न्यायालयाद्वारे सुनावण्यात आलेली दोन वर्षांची शिक्षा लागू होती. त्यामुळे ते अध्यक्षपदासाठी पूर्णत: अपात्र होते. मात्र बच्चू कडू यांनी ही माहिती दडवून ठेवली. अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी गैरमार्गाने प्रस्ताव तयार करुन अवास्तव खर्च केला. अनावश्यक साहित्य खरेदी आणि गरज नसताना निर्माणकार्य करुन त्यात पैशांचा अपहार करण्यात आल्याचा दावा या संचालकांनी केला. यासंदर्भात तक्रारी झाल्या तेव्हा आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करुन अधिकार्‍यांवर दबाव टाकला आणि प्रकरणे दाबल्याचे यावेळी सांगण्यात आले. बँकेचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांचा व्यवहार असंवैधानिक आणि अशोभनीय असल्याची टीका यावेळी संचालकांनी केली. बरेचदा ते विरोधी संचालकांसाठी असंसदीय शब्दांचा प्रयोग करतात, असेही या संचालकांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडूनकार्यकर्त्यांद्वारे गुडागर्दी करुन विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. अशीच दडपशाही करुन ते शासनाच्या प्रतिनिधींसह जिल्हा उपनिबंधक व विभागीय सहनिबंधकांना बँकेत पाउलही ठेवू देत नाही, बँकेत हम करे सो कायदा अशा मनमानी पद्धतीने बच्चू कडू यांचा कारभार चालला असल्याचे संचालक म्हणाले. या सर्व प्रकरणांबाबत न्यायालयाकडे दाद मागण्यात येणार आहे. असे विरोधी संचालकांनी सांगितले. अध्यक्ष बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे, संचालक आनंद काळे हे संगणमतातून बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करित असल्याचा आरोप या संचालकांनी केला आहे. त्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नूकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही संचालकांच्या वैयक्तिक वाहनावरील चालकांचे वेतन बँकेच्या तिजोरीतून दिले जात आहे, यातून गैरप्रकाराची व्याप्ती किती खोल आहे, हे कळून येत असल्याचे संचालक म्हणाले.

 

संबंधित बातम्या

Back to top button