हव्याप्र मंडळाच्या डीसीपीई महाविद्यालयाच्या मुला-मुलींच्या संघांची अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण भरारी
विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत दोन्ही संघांची चॅम्पियनशिपवर मोहोर

अमरावती / 3 नोव्हेंबर – मातीवर घाम गाळत केलेल्या कठोर परिश्रमाने आणि शिस्तबद्ध सरावाने अमरावतीतील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ’डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन’ अर्थात डिसीपीर्सीच्या खेळाडूंनी अॅथलेटिक्सच्या मैदानात नवा इतिहास रचला आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन अथलेटिक्स स्पर्धेत या महाविद्यालयाच्याकुमार आणि कुमारिकांच्या दोन्ही संघांनी घवघवीत यश संपादन करत थेट चॅम्पियनशिपचे विजेतेपद आपल्या नावावर केले. ट्रॅक आणि फील्डच्या प्रत्येक प्रकारात आपल्या कौशल्याची आणि शारीरिक क्षमतेची प्रभावी छाप सोडत खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः पाणी पाजले. या संपूर्ण दैदिप्यमान प्रवासात सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर खेळाडूंनी जिगरबाज खेळ केला. अॅथलेटिक्स हा खेळ गती, चपळता आणि मानसिक कणखरपणाची कसोटी पाहणारा मानला जातो. या कसोटीत डिसीपीर्सीच्या खेळाडूंनी अव्वल ठरत आपले वर्चस्व सिद्ध केले. खेळाडूंच्या या ऐतिहासिक यशामागे प्रशिक्षक प्राध्यापक सुनील पिंपळे, जया देशमुख आणि व्ही. एस. चावरे यांनी घेतलेली मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, कार्याध्यक्ष एडवोकेट प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्राध्यापिका माधुरी चेंडके, प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव प्राध्यापक रवींद्र खांडेकर आणि सचिव प्राध्यापक विकास कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी क्रीडा वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यापीठाच्या या यशामुळे संपूर्ण महाविद्यालयाची मान अभिमानाने उंचावली आहे.





