दुष्काळ निवारणासाठी 15,386 कोटींचा प्रस्ताव
राज्यात 97 टक्के कृषी क्षेत्रावर पंचनामे; 141.53 लाख हेक्टर क्षेत्र बाधित

मुंबई /2 नोव्हेंबर : कोरड्या दुष्काळामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. राज्याच्या 33 जिल्ह्यांतील 304 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, आतापर्यंत 37,528 गावांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात 1 नोव्हेंबरपर्यंत 97 टक्के कृषी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. दुष्काळात 141.53 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 15,386.19 कोटींचा प्रस्ताव राज्याकडून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
‘अल-निनो’च्या प्रभावामुळे यंदा राज्यात पावसाची मोठी तूट आहे. कोरड्या दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले. राज्यातील 304 तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 आणि ट्रिगर-2 लागू करण्यात आले आहेत. या तालुक्यांमध्ये एकूण 37 हजार 496 गावांचा समावेश आहे. एक कोटी 67 लाख 56 हजार 276 खातेदार शेतकर्यांपैकी एक कोटी 61 लाख92 हजार 595 शेतकर्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सुमारे 97 टक्के शेतकर्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.ट्रिगर-1 लागू करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये एकूण सुमारे एक कोटी 66 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व शेती करण्यात आली आहे. यापैकी सुमारे एक कोटी 61 लाख 31 हजार 362 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पिकांच्या नुकसानीची खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी संबंधित विभागांकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.कृषी विभागाच्या कोकण, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर विभागात 100 टक्के पंचनामे पूर्ण झाले. पुणे 94 टक्के, लातूर 97 टक्के, अमरावती 99 टक्के, तर सर्वात कमी नागपूर विभागात 86 टक्के पंचनामे झाले आहेत.
33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले एकूण क्षेत्र 141.53 लाख हेक्टर आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे एकूण 15 हजार 386.19 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर केला. जिरायतीचे 106.54 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सध्याच्या दरानुसार हेक्टरी आठ हजार 500 रुपयांची मदत देण्यासाठी नऊ हजार 056.37 कोटी, बागायतीच्या 28.05 लाख हेक्टर बाधितच्या प्रति हेक्टर 17 हजार मदतीसाठी चार हजार 768.62 कोटी आणि बहुवार्षिक 6.94 लाख हेक्टर बाधित क्षेत्राच्या प्रति हेक्टर 22 हजार मदतीसाठी एक हजार 561.20 कोटींचा निधी लागणार आहे





