शिक्षकांची टीईटी परीक्षा आता पुढल्यावर्षी
सर्वोच्च न्यायालयाकडून दोन वर्षांची मुदतवाढ

शिक्षकांना 22 महिन्यांत मिळणार पाच मोठ्या संधी
अमरावती /1 नोव्हेंबर – चालू वर्षातील शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द झाली असून राज्यातील 2 लाख 26 हजार 263 शिक्षकांना मोठा फटका बसला आहे. आता ही परीक्षा नव्या वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर थेट संगणकावर ऑनलाईन घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची शेवटची मुदत दिली असून शिक्षकांना पुढील 22 महिन्यांत पाच संधी मिळणार आहेत.
राज्यातील सुमारे 2 लाख 50 हजार शिक्षक अजूनही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. पदोन्नती, निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतनश्रेणी मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण असणे शासनाने बंधनकारक केले आहे. यासाठी शिक्षकांपुढे केंद्र शासनाची पात्रता परीक्षा किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची राज्यस्तरीय परीक्षा असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. केंद्राची परीक्षा वर्षातून एकदाच भरवली जाते. त्यामुळे शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून राज्य परीक्षा परिषदेने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचे ठरवले होते. मात्र पेपरफुटीच्या गैरप्रकारामुळे या वर्षात एकही परीक्षा पार पडू शकली नाही.पेपरफुटी रोखण्यासाठी यापुढे सर्व परीक्षा संगणकावर ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या ज्येष्ठ शिक्षकांना या परीक्षेतून पूर्ण सूट देण्यात आली आहे. मात्र इतर सर्व सेवेतील शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण करणे सक्तीचे ठरणार आहे. अचानक परीक्षा ऑनलाईन होणार असल्याने 50 ते 53 वयोगटातील शिक्षकांची धांदल उडणार आहे. या वयातील शिक्षकांना अभ्यास करण्यासोबतच संगणक हाताळणे आणि वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करावा लागणार आहे





