दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार

मुंबई/30 ऑक्टोबर ; राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ आणि अवकाळी संकटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत यंदाची दिवाळी साजरी करायची कशी, असा प्रश्न अनेक शेतकरी कुटुंबांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिवाळीच्या काळात दिलासा देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा उपक्रम हाती घेतला आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत दिवाळी शिधा पोहोचवण्यासाठी तब्बल २०० ट्रक रवाना करण्यात आले. या ट्रकना एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये हा शिधा पोहोचवण्यात येणार आहे.
या उपक्रमात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले असून, लाभार्थी शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर मानसिक आधाराचीही गरज असते, अशी भूमिका या उपक्रमातून मांडण्यात आली आहे.
शिधा स्वीकारताना शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या अभियानाचे यश असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. संकट कितीही मोठे असले, तरी शेतकऱ्यांनी स्वतःला एकटे समजू नये, शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येणे, हीच सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगत बळीराजाच्या घरातही दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.





